रत्नागिरी ः दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे
रत्नागिरी ः दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे

रत्नागिरी ः दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे

sakal_logo
By

दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे
पालकमंत्री उदय सामंत ः १ कोटी ४४ लाखाची तरतूद
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामात ६६ हजार हेक्टर क्षेत्र हे भातपिक लागवडीखाली आहे. या क्षेत्रात भाताची लागवड करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना भातपिकाचे मोफत बियाणे पुरवण्यात येईल. याकरिता १ कोटी ४४ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत सांगितले.
पालकमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. या बैठकीला आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत, कृषी विद्यावेत्ता नारळ संशोधन केंद्र भाट्ये डॉ. के. व्ही. मालशे आदी उपस्थित होते. या वेळी सामंत यांनी सांगितले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी बियाणे योग्य वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. जिल्ह्यात आंबा, काजू, भात या पिकांसह नाचणी, हळदसारख्या पिकांचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
दरम्यान, जिल्ह्यातील पिकांची लागवड, फळपिक उत्पादन, पर्जन्यमान तपशील, प्रमुख पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता, फळबाग लागवड, सिंचन याबाबतची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित झालेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिले.


चौकट
आंब्यावरील रोग निवारणासाठी संशोधन करा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने आंबा फळावरील रोग निवारणासाठी संशोधन करावे तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोकण कृषी विद्यापिठाने प्रशिक्षण केंद्र तयार करून या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. शासनामार्फत जास्तीत जास्त भात खरेदी करण्यात यावी जेणेकरून शेतकरी भातपिक लागवडीसाठी प्रोत्साहित होतील. कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात काजू बागायतदारांचा मेळावा आयोजित करावा, अशा सूचनाही सामंत यांनी दिल्या.