आंतरजिल्हा बदलीनंतर 1127 शिक्षक पदे रिकामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरजिल्हा बदलीनंतर 1127 शिक्षक पदे रिकामी
आंतरजिल्हा बदलीनंतर 1127 शिक्षक पदे रिकामी

आंतरजिल्हा बदलीनंतर 1127 शिक्षक पदे रिकामी

sakal_logo
By

शिक्षकांची ११२७ पदे रिक्त
आंतरजिल्हा बदलीनंतरची स्थिती; दुसऱ्या जिल्ह्यातील १७ पैकी ११ जण रुजू
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ः जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या तब्बल ४५१ शिक्षकांना सोडण्यात आले आहे तर त्या बदल्यात जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने केवळ १७ शिक्षक येणार आहेत. यातील आतापर्यंत ११ शिक्षक हजर झाले आहेत. त्यामुळे एकूण ३८१३ शिक्षक पदांपैकी जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची संख्या ११२७ झाली आहे. ही संख्या एकूण शिक्षकांच्या ३० टक्के झाली आहे. त्यामुळे १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करताना शिक्षकांचे नियोजन करताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आंतरजिल्हा बदली होऊनही एकूण शिक्षक संख्येच्या १० टक्के पेक्षा जास्त रिक्त संख्या असल्याने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. मात्र, विद्यमान सरकारने १५ एप्रिलनंतर या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने २ मेनंतर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. ऑनलाईन पद्धतीने बदली झालेल्या ४४३ शिक्षकांचा यात समावेश असून ऑफलाईन पद्धतीने बदली झालेल्या आठ शिक्षकांचा यात समावेश आहे. एकूण ४५१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या एकूण १३८७ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांत उपशिक्षकांची २ हजार ९१३ पदे मंजूर आहेत. यातील २ हजार ५४८ पदे भरलेली होती तर ३६५ पदे रिक्त होती. पदवीधर शिक्षकांची ९८० पदे मंजूर आहेत. यातील ६६९ पदे भरलेली होती तर ३११ पदे रिक्त होती. अशाप्रकारे एकूण ३ हजार ८१३ पदे मंजूर असून त्यातील ३ हजार २१७ पदे भरलेली होती तर ६७६ पदे रिक्त होती. कार्यरत असलेल्या उपशिक्षकांच्या २ हजार ५४८ शिक्षकांपैकी ४४६ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीमुळे कार्यमुक्त करण्यात आले आहे तर ६६९ पदवीधर कार्यरत शिक्षकांपैकी पाच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीमुळे कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात आता उपशिक्षकांच्या २ हजार ९१३ एकूण पदांपैकी २ हजार १०२ पदे भरलेली आहेत व ८११ पदे रिक्त आहेत. पदवीधरांच्या ९८० पैकी ६६४ पदे भरलेली असून ३१६ पदे रिक्त आहेत. एकूणच ३ हजार ८१३ उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांपैकी २ हजार ६८६ पदे भरलेली असून एक हजार १२७ पदे रिक्त आहेत. ही टक्केवारी ३० टक्केच्या जवळपास आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणात अग्रेसर आहे. दहावी, बारावी निकालात या जिल्ह्याने सातत्याने राज्यात प्रथम क्रमांक टिकवला आहे. मात्र, त्याच जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची टक्केवारी ३० टकेच्या जवळ गेल्याने शासनाची उदासीनता लक्षात येते.
----------------
चौकट
रिक्त पदांत भर
मुळात जिल्ह्यात ३० टक्के शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यातच मे आणि जून महिन्यात आणखी ३० पदे रिक्त होणार आहेत. नियत वयोमानानुसार मे महिन्यात १४ तर जून महिन्यात १६ शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांत आणखी भर पडणार आहे.
----------
चौकट
‘त्या’ शाळा उघडणार कोण?
आंतरजिल्हा बदली झालेल्या ४५२ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने रिक्त पदांची पोकळी अधिक वाढली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांना सोडल्याने जिल्ह्यात ११२७ शिक्षक पदे रिक्त झाली आहेत. यामुळे जिल्ह्यातील १३८७ पैकी असंख्य शाळांत एकही शिक्षक कार्यरत राहिलेले नाहीत. अलीकडेच तालुका बदली सुद्धा पार पडली आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षक दुसऱ्या शाळेवर गेले आहेत. त्यामुळे एकही शिक्षक नसलेल्या शाळांची संख्या अधिकच वाढली आहे. १५ जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर शाळा उघडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--------------
चौकट
सहा शिक्षकांची प्रतिक्षा
आंतरजिल्हा बदलीने ४५१ शिक्षक गेले आहेत. मात्र, याच बदलीने जिल्ह्यात येण्यास केवळ १७ शिक्षक इच्छुक आहेत. यातील ११ शिक्षक हजर झाले आहेत. अद्याप सहा शिक्षक हजर झालेले नाहीत.
------------
चौकट
ग्रामीण शाळांवर दुष्परिणाम
हजर होणारे शिक्षक रिक्त असलेल्या शाळांतील आपल्याला सोईस्कर ठरेल, अशी शाळा मागून तेथे हजर होणार आहेत. तशी तजवीज शासनाने केली आहे. हे शिक्षक शहरानजीक असलेल्या शाळा घेणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रिक्त जागा तशाच राहणार आहेत.
--------------
चौकट
भरतीबाबत अस्पष्टता
शासनाने प्राथमिक शिक्षक भरती जाहीर केली आहे. परंतु, अद्याप त्यात स्पष्टता नाही. रिक्त सर्व जागा भरणार आहेत का? मुलांच्या पटसंख्येच्या आधारे भरती होणार? याबाबत कोणतेच स्पष्ट निर्देश नाहीत. याशिवाय राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने मोठ्या संख्येने गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वाढीव कोटा देणार का? याचेही उत्तर मिळालेले नाही.