
केळबाई मंदिर-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा
केळबाई मंदिर-तारकर्ली बंदर
रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ : देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर उर्वरित रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम १५ मेपर्यंत न झाल्यास १७ पासून येथील उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील तारकर्ली हा गाव पर्यटनाचा बालेकिल्ला समजला जात असून देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर रस्त्याचे खडीकरण करून हॉटमिक्स व्हावा, यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर काम सुरू झाले. देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारित येत असल्याने उर्वरित देवी केळबाई ते वायरी हा रस्ता अर्धवट राहिलेला असून तो निकृष्ट आहे. साईटपट्टी पूर्णतः गेली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध असताना सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न बापर्डेकर यांनी उपस्थित केला आहे. येत्या १५ तारखेपर्यंत या रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास १७ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.