भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे
भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे

भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे

sakal_logo
By

१४ (टुडे पान ३ साठी)

(६ मे टुडे तीन)


इये साहित्याचिये नगरी...........लोगो

फोटो ओळी
-rat१२p३.jpg ः
२३M०२२८६
विष्णुपंत छत्रे
-rat१२p१२.jpg ः
२३M०२३०१
प्रकाश देशपांडे
-----------

भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे

सर्कस आबालवृद्धांना आवडते. पूर्वी गावात सर्कस आली की, लहान मुलांमध्ये आनंदाची लाट यायची. सर्कशीतले वाघ, सिंह, हत्ती, घोडे, तो भव्य तंबू वेगळेच आकर्षण असायचे. अशा चित्तथरारक भारतीय सर्कशीचे आद्य जनक विष्णुपंत छत्रे आपल्या कोकणातले. विष्णुपंतांचे मूळगाव रत्नागिरीजवळचे बसणी. आजही तिथे त्यांच्या घराचा चौथरा आहे. विष्णुपंतांचे वडील पटवर्धन संस्थानिकांचे आश्रित होते. त्यांचे कुटुंब राहायचे सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या गावी. पंतांची जन्मतारीख उपलब्ध नाही; मात्र त्यांचा जन्म १८४०च्या सुमाराला झाला असल्याचे संदर्भ मिळतात. लहानपणी अत्यंत हूड होते. शालेय शिक्षणापेक्षा कुत्रे, माकडे पाळायचे. कबुतरे उडवायची हाच छंद. प्राथमिक शिक्षण कसेबसे झाले आणि वडिलांनी त्यांना कर्नाटकातील जमखिंडी येथे नेले. जमखिंडी हेही पटवर्धनांचे संस्थान होते. १८५७ चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले. या समराची झळ जमखिंडी संस्थानला लागली. त्यामुळे ही स्वारी कर्नाटकातच रामदुर्ग संस्थानात आली. रामदुर्गचे राजे रामराव भावे यांच्याकडे चाबूकस्वार म्हणून नोकरीला लागले. पंतांना गाण्याचीही आवड होती; मात्र आपण गायक म्हणून नावलौकिक मिळवावा यासाठी गुरू शोधायला बाहेर पडले. त्या वेळी उत्तर भारतातील अनेक संस्थानात नामवंत गायक राजगायक म्हणून प्रसिद्ध होते. विष्णुपंत निघाले उत्तर भारताकडे. जवळ पैसा नव्हता. थोडेफार होते त्यातून जळगावपर्यंत रेल्वेने आणि पुढे ग्वाल्हेरपर्यंत हे महाशय चालत गेले. ग्वाल्हेर हे मोठे नावाजलेले संस्थान. या संस्थानचे सरदार बाबासाहेब आपटे हे अश्‍वविद्येत निपूण म्हणून प्रख्यात होते. विष्णुपंत बाबासाहेबांच्या पदरी आठ-दहा वर्षे राहिले. या काळात त्यांनी बाबासाहेबांकडून अश्‍वविद्या अवगत केली. ग्वाल्हेर दरबारात हद्दुखाँ हे ख्याल गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे संस्थापक. विष्णुपंत हद्दुखाँचे गंडाबंद शिष्य झाले.
विष्णुपंत महाराष्ट्रात आले. त्यांचे अश्‍वविद्येतील नैपुण्य बघून अनेक राजे महाराजे त्यांना मुद्दाम आपल्या अश्‍वांना शिक्षण देण्यासाठी बोलावत. इंदूरचे राजे शिवाजीराव होळकर यांचा एक नाठाळ घोडा होता. होळकरांनी विष्णुपंतांना त्याला वठणीवर आणण्यासाठी निमंत्रण दिले. पंतांनी काही दिवसातच घोड्याला उत्तम शिकवून तयार केले. मुंबर्इत चेअर्नी विल्सन या युरोपियन माणसाची सर्कस आली होती. क्रॉस मैदानात तंबू उभा करून ‘हार्मिस्टन सर्कस’ सुरू झाली. विष्णुपंत सर्कशीतली घोड्यांची कामे बघायला गेले. सर्कशीचा प्रयोग झाल्यानंतर मोठ्या आढ्यतेने विल्सन म्हणाला, ‘हे भारतीयांचे काम नव्हे. अजून काही वर्षे त्यांना हे जमणार नाही.‘ पंतांना हे शब्द झोंबले. ते कुरूंदवाडला आले. कुरूंदवाड ही पटवर्धनाची जहांगिरी. पटवर्धन सरकारांनी विष्णुपंताना सहकार्य केले आणि कुरूंदवाडलाच सर्कशीचा पहिला प्रयोग ५ ऑक्टोबर १८७८ ला केला. या सर्कशीत झुल्यावरची कामे करायला स्वतः विष्णुपंतांची पत्नी होती. नऊवारी साडी नेसणारी घरातली एक स्त्री झुल्यावर चित्तथरारक झोके घेते हे अघटित होते. पुढच्याच वर्षी पंतांनी आपली सर्कस मुंबर्इला नेली. चेअर्नी विल्सनच्या तंबू शेजारी क्रॉस मैदानावर सर्कशीचे खेळ सुरू झाले. पंतांच्या सर्कशीने बाजी मारली. अखेर पराभूत विल्सनने आपली सर्कस सामानासह विष्णुपंतांना विकली. विल्सनच्या सर्कशीतील दोन इंग्रज स्त्रिया आणि चार पुरुष यांना आपल्या सर्कशीत घेतले आणि प्रो. विष्णुपंत छत्रे यांची ‘ग्रँड इंडियन सर्कस’ सुरू झाली.
विष्णुपंतांच्या नसानसात राष्ट्रप्रेम भरलेले होते. त्यांच्या सर्कशीचा प्रारंभच व्हायचा तो दोन सिंहांच्या रथातून भारतमाता येऊन.सिंहांनी ओढलेला रथ रिंगणात आला की, समोर सजलेला हत्ती येऊन आपल्या सोंडेने भारतमातेच्या गळ्यात हार घालत असे. लोकमान्य टिळकांशी विष्णुपंताचा नित्यसंबंध होता. लोकमान्य सर्कस पाहायला यायचे. स्वातंत्र्याची चळवळ वेगाने वाढत होती. अनेक क्रांतिकारक भूमिगत होऊन देशकार्य करत होते. या क्रांतिकारकांना हक्काचे आश्रयस्थान होते. ‘ग्रँड इंडियन सर्कस.'' पुण्याच्या चित्रशाळा प्रेसचे वासुकाका जोशी इंग्रज सरकारची नजर चुकवण्यासाठी या सर्कशीतून अनेक देश फिरले. आता ही सर्कस चीन, जपान अशा राष्ट्रांतून खेळ करत होती. भारतात ज्या गावी सर्कस असे त्या गावातील शिक्षणसंस्थांना ते आर्थिक देणग्या देत. सर्कस ऐनभरात असताना विष्णुपंतांनी आपले बंधू काशिनाथपंत यांच्या स्वाधीन केली. काशिनाथपंतांनी अगदी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत सर्कस नेली. या सर्कशीत काम करणारे अनेक कलाकार सांगली, म्हैसाळ, मिरज, तासगाव या भागातील होते. त्यातून प्रेरणा घेऊनच तासगावच्या परशुराम माळी याची ‘परशुराम लायन सर्कस’, ‘शंकरराव कार्लेकरांची’, ‘कार्लेकर ग्रँड सर्कस’, बंडोपंत देवलांची ‘देवल सर्कस’, अशा अनेक सर्कशी सुरू झाल्या. एका तासगाव शहरामधून १५ सर्कशी सुरू झाल्या. त्यातली ‘जी. ए. सर्कस ऑफ बॉम्बे’ विशेष गाजली. कोकणातून नंतरच्या काळात प्रो. नारायणराव वालावलकरांची ‘ग्रेट रॉयल सर्कस’ अनेक वर्षे होती. विष्णुपंतांची सर्कस एकदा काशीला गेली होती. तिथे त्यांना एक चांगला गायक पण भणंग स्थितीत असल्याचे समजले. विष्णुपंतांनी त्या गायकाचा शोध घेतला आणि आश्‍चर्यचकित झाले. ज्या हद्दुखाँ साहेबांचे पंत गंडाबंद शिष्य होते त्या हद्दुखाँचे चिरंजीव रहिमतखाँ होते. विष्णुपंत त्यांना बरोबर घेऊन आले. ज्या ठिकाणी सर्कशीचा मुक्काम असेल तिथे रहिमतखाँच्या मैफली करू लागले. रहिमतखाँ यांना गायनक्षेत्रात ‘भूगंधर्व’ असा लौकिक मिळाला. त्यांना सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत होती; पण गुरूऋण मानणाऱ्या विष्णुपंतांनी आयुष्यभर सांभाळले. रहिमतखाँ यांना घेऊन आयुष्याच्या अखेरीला पंत इंदूरला राहिले. मधुमेहाच्या विकाराने २० फेब्रुवारी १९०५ ला हा नरसिंह निधन पावला.
गेल्या काही वर्षात सर्कसधंद्याला उतरती कळा आली आहे. सर्कशीत वन्यप्राणी आणायला बंदी आली. त्यामुळे वाघ, सिंह असे जंगलातले प्राणी आणि त्यांचे खेळ थांबले. वाढत्या महागार्इमुळे आणि प्रेक्षकांचा अपुरा प्रतिसाद यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व सर्कशी बंद पडल्या. परदेशात मात्र अशी बंदी नसल्याने सुरू आहेत. पूर्वी सर्कशीत काम केलेल्या शिवाजीराव कार्लेकर, बंडोपंत देवंल आणि अमेरिकेतील जगप्रसिद्ध रिंगलिंग सर्कशीत ज्यांनी आफ्रिकेतील अत्यंत क्रूर अशा जॅग्वारसारख्या हिंस्र पशूंना लिलया खेळवले ते दामू धोत्रे यांचे अनुभव कथन करणारी पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली सर्कस सुरू करणारा वीर कोकणातल्या बसणी गावातला सुपुत्र होता.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)