शिक्षक पतपेढीत सत्ता परिवर्तनाचा निश्चय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक पतपेढीत सत्ता परिवर्तनाचा निश्चय
शिक्षक पतपेढीत सत्ता परिवर्तनाचा निश्चय

शिक्षक पतपेढीत सत्ता परिवर्तनाचा निश्चय

sakal_logo
By

swt१२८.jpg
02322
सिंधुदुर्गनगरीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना म. ल. देसाई. सोबत संतोष पाताडे, के. टी. चव्हाण, राजाराम कविटकर व अन्य.

शिक्षक पतपेढीत सत्ता परिवर्तनाचा निश्चय
परिवर्तन सहकार पॅनलः सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ः यापूर्वी प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत आमचे तालुका उमेदवार निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. जिल्हा मतदार संघ निवडणुकीत सुद्धा १०० च्या आता मतांनी पराभूत होत होते; मात्र यावेळी आम्ही बहुसंख्य संघटना एकत्र येत परिवर्तनाचा निर्धार केला आहे. त्यामुळे आमची ताकद वाढली असून सर्वच मतदारांनी सत्ता परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पॅनलच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परिणामी ते मतदारांत संभ्रम करणारी चुकीची विधाने करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप परिवर्तन सहकार पॅनलच्या वतीने आज करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी परिवर्तन सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलने केलेल्या आरोपांचे यावेळी खंडन करण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, परिवर्तन पॅनेल प्रवक्ते के. टी. चव्हाण, पुरुषोत्तम शेणई, गणेश नाईक, संजय जाधव, सचिन जाधव, संदीप देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, ‘‘शिक्षक मतदारांत परिवर्तनाची लाट आहे. २२ वर्षे सत्तेत असलेल्यांच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी हा निर्णय घेतला आहे. आठ संघटना एकत्र आहेत. त्यामुळे सत्ताधारी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत आमचा निसटता पराभव होत होता. तो धोका टाळण्यासाठी आमचे एकसंघ काम सुरू आहे. विरोधक चुकीच्या पद्धतीने बाजू मांडून संभ्रम निर्माण केला आहे. गेली २२ वर्षे ९ टक्के व्याजाने कर्ज मिळत होते. तीन तास जनरल सभा सर्व संघटनांनी रोखून धरली. त्यानंतर पावणे ९ टक्के व्याज केले. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही ८ टक्के व्याजाने गृहकर्ज देण्याचे जाहीर केल्यावर आता सत्ताधारी साडे आठ टक्के दराने कर्ज देणार असल्याचे सांगत आहेत. ३० लाख रुपये आम्ही कर्ज रक्कम वाढविली. परंतु, सत्ताधारी याबाबत चुकीचे बोलत आहेत. प्रत्यक्षात कर्ज रक्कम वाढवायला काहीही हरकत नाही. कर्जाची उचल झाल्यावर नफा आपोआप वाढणार आहे.’’
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘आम्ही विरोधात असतानाही गेली २२ वर्षे पतपेढी उज्वल होण्यासाठी सहकार्य केले. विरोधकांनी हास्यास्पद, बालिश आरोप केले आहेत. शिक्षक संघ या संघटनेवर व्यक्तिशः आरोप केला आहे. त्याचा मी निषेध करतो. ही त्यांची मूळ खोड आहे. ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे. जनरल सभेत जेवण निकृष्ट मिळाल्याचे त्यांच्याच सभासदाने सांगितले होते. मी पुढील सर्वसाधान सभेत दर्जेदार जेवण मिळण्याची मागणी केली. त्यांचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केलेला नाही. एकही मुद्दा घेतलेला नाही. कार्यालयीन फर्निचर चांगले असताना ते बदलण्यासाठी ९ लाख ३० हजाराचे काम सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे मतदार आमच्या सोबत असल्याने त्यांचे पाय थरथरायला लागले आहेत. आम्ही कामातून कोण चांगले आहेत, हे दाखविणार आहोत. पतसंस्थेची शान आणि शिक्षकांची मान झुकू नये यासाठी आम्ही आतापर्यंत आरोप सहन केले आहेत. मात्र यापुढे करणार नाही. घाट्याच्या हातात सत्ता द्यायची नाही, असाही आरोप केला गेला. पण आम्ही सर्वांना संधी दिली आहे. यापुढे आरोप बंद झाले नाहीतर यापेक्षा खळबळ जनक माहिती समोर आणणार.’’ श्री. कविटकर यांनी ही विचारांची लढाई आहे. आम्ही ही लढाई विचाराने जिंकणार आहोत. भाग्यलक्ष्मी पॅनलचा धुव्वा उढणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
------------------
चौकट
परिवर्तन दिसेलः पाताडे
सत्ताधारी आमच्यावर एक मत मागत आहोत, असा आरोप करीत आहेत; पण ते चुकीचे असून आम्ही सर्व जागांसाठी मत मागत आहोत. विरोधक सैरभैर झाले आहेत. महिला मतदारांना मतदान केल्याचा फोटो काढून पाठवायला सांगत आहेत. याचा अर्थ तुमचा मतदारांवर विश्वास नाही का? मात्र आमच्या मतदारांवर आमचा विश्वास आहे. त्यांचा बालिश प्रचार सुरू असला तरी १५ ला परिवर्तन झालेले निश्चित दिसेल, असा विश्वास यावेळी पाताडे यांनी व्यक्त केला.
---------------------
चौकट
...तर युती कशी करणार होता?
दोडामार्ग भ्रष्टाचारावरून शिक्षक संघाला टार्गेट केले जात आहे. आम्ही भ्रष्टाचार केलेल्यांची पाठराखण करणार नाही; पण पैसे जिल्हा शाखेतून दिले गेले होते. त्यावर सत्ताधारी म्हणून तुमचा अंकुश नाही का? २००७ ला हा अपहार झाला. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकीत आमच्या संघटनेचा संचालक निवडून आला. आम्ही भ्रष्टाचार करीत असतो तर आमच्या सोबत युती कशी करणार होता, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित करीत बिनविरोध करण्याचे नाटक सत्ताधारी यांनी केले होते. आम्ही दोन संघटना बिनविरोध करून उपयोग काय? बाकीच्या संघटनांचा समावेश कुठे होता? सर्व संघटनांचा समावेश आवश्यक होता, मग निवडणूक बिनविरोध होणार कशी? असे सांगत आम्ही तगडे उमेदवार दिसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही जाहीर केलेली गृहकर्ज योजना त्यांना अडचणीची ठरली आहे, असेही ते म्हणाले.
-----------------