३२ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत
३२ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

३२ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

sakal_logo
By

02547
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शिक्षक पतपेढीची इमारत.


३२ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

प्रा. शिक्षक पतपेढीसाठी आज मतदान; ‘भाग्यलक्ष्मी’ विरुद्ध ‘परिवर्तन’ रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक उद्या (ता. १४) होत आहे. १५ संचालक पदासाठी ३२ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असून सत्ताधारी गटाचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल विरुद्ध परिवर्तन सहकार पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत आठ मतदान केंद्रे यासाठी तयार केली असून सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. २,९८२ मतदार सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केली आहे. यासाठी २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात आले. एकूण ८७ अर्ज आले होते. ३ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या दिवशी ५५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने रिंगणात ३२ उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी २,९८२ शिक्षक मतदार निश्चित झाले आहेत.
ही निवडणूक भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल विरुद्ध परिवर्तन सहकार पॅनेलमध्ये होत आहे. यात परिवर्तन पॅनेलकडून तालुका मतदार संघासाठी धर्मराज धूरत (देवगड), दिनकर केळकर (वैभववाडी), रवींद्र जाधव (कणकवली), राजाराम कविटकर (कुडाळ), संतोष पाताडे (मालवण), सुभाष सावंत (सावंतवाडी), सागर कानजी (वेंगुर्ले) हे निवडणूक रिंगणात आहेत, तर जिल्हा राखीव मतदार संघासाठी अनुसूचित जाती-जमातींमधून मनोजकुमार आटक, जिल्हा सर्वसाधारण दोन जागांसाठी अरविंद पाळेकर, अशोक साळुंके-देशमुख, महिला राखीव दोन जागांसाठी नेहा सावंत, संचिता सावंत, इतर मागास प्रवर्गासाठी संतोष कोचरेकर, तर भटक्या जाती विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्गासाठी अनिल वरक निवडणूक लढवीत आहेत.
सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे तालुका सर्वसाधारण क्षेत्र उमेदवार विजय सावंत (कुडाळ), श्रीकृष्ण कांबळी (कणकवली), मंगेश कांबळी (मालवण), सीताराम लांबर (वेंगुर्ले), महेश काळे (दोडामार्ग), गोविंद शेर्लेकर (सावंतवाडी), संतोष राणे (देवगड), संतोष मोरे (वैभववाडी) हे उमेदवार निश्चित करण्यात आले असून जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पुरुष नारायण नाईक व संतोष राणे, जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र महिला ऋतुजा जंगले व समीक्षा परब, जिल्हा इतर मागास प्रवर्ग महेंद्र पावसकर, जिल्हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग चंद्रसेन पाताडे, जिल्हा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग संजय पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
परिवर्तन सहकार पॅनेलमध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य दिव्यांग शिक्षक संघटना, सत्यशोधक शिक्षक संघटनेचा समावेश आहे. राजाराम कविटकर हे पॅनेल प्रमुख आहेत, तर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलमध्ये प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या संघटनांचा समावेश आहे. राजन कोरगावकर हे या पॅनेलचे प्रमुख आहेत.
................
चौकट
दोडामार्ग, वेंगुर्लेत बंडखोरीमुळे रंगत
विविध संघटना एकत्रित येऊन भाग्यलक्ष्मी विरुद्ध परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात असताना दोडामार्ग आणि वेंगुर्ले या दोन तालुक्यांत बंडखोरी झाली आहे. दोडामार्ग तालुक्यात परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. येथे या पॅनेलच्या दयानंद नाईक, राजेंद्र काळबेकर यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे ‘परिवर्तन’ने येथे पॅनेलचा उमेदवार दिलेला नाही, तर वेंगुर्ले येथे एकनाथ जानकर यांनी बंडखोरी केली आहे. परिवर्तन पॅनेलने दोडामार्ग तालुका वगळून १४ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. ‘भाग्यलक्ष्मी’ने सर्व १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
................
कोट
उद्या सकाळी आठ ते दुपारी चार या दरम्यान मतदान प्रक्रिया होणार आहे. आठ तालुक्यांत आठ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. यासाठी यंत्रणा सज्ज आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी नऊला सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी सुरू होणार आहे.

- उर्मिला यादव, निवडणूक निर्णय अधिकारी.