श्रीमंत शिवरामराजेंमुळे सावंतवाडीच्या ‘लाखकले’ला उर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीमंत शिवरामराजेंमुळे सावंतवाडीच्या ‘लाखकले’ला उर्जा
श्रीमंत शिवरामराजेंमुळे सावंतवाडीच्या ‘लाखकले’ला उर्जा

श्रीमंत शिवरामराजेंमुळे सावंतवाडीच्या ‘लाखकले’ला उर्जा

sakal_logo
By

पाऊलखुणा ः भाग - १२१

02706
सावंतवाडी ः येथील पॅलेसमध्ये आजही सावंतवाडीची ओळख असलेली हस्तकला जोपासण्याचे काम सुरू आहे. (छायाचित्र ः अतुल बोंद्रे)
02707
दिल्ली ः येथे अखिल भारतीय हस्तकला मंडळ व उद्योग संचालनालय यांनी भरविलेल्या एका हस्तकला प्रदर्शनात सहभागी झालेले श्रीमंत शिवरामराजे भोसले.

श्रीमंत शिवरामराजेंमुळे सावंतवाडीच्या ‘लाखकले’ला ऊर्जा

लीड
सिंधुदुर्गात लाकडी खेळण्यांसह हस्तकला उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी श्रीमंत शिवरामराजे यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. राज्य हस्तकला मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्याही पूर्वी ‘सावंतवाडी लॅकर वेअर्स’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडीची लाकडी खेळणी आंतरराष्ट्रीय बनविली. त्याची फळे आजही चाखायला मिळत आहेत.
----------------------
राजेसाहेबांना मुळातच कला क्षेत्राची विशेष आवड होती. विद्यार्थी दशेतही संगीत क्षेत्राकडे त्यांचा अधिक ओढा होता. या क्षेत्रात त्यांनी ‘मास्टरी’ मिळविली होती. त्यांना मिळालेल्या सहचारिणी राणीसाहेब श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले याही कला जपणाऱ्या होत्या. त्या स्वतः उत्कृष्ट चित्रकार आणि हस्तकला क्षेत्रामधील कुशल कलावंत होत्या. या दाम्पत्याने सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांसाठी दिलेले योगदान कधीच विसरता न येणारे आहे.
सावंतवाडीत कित्येक वर्षे ‘लाखकला’ अर्थात लाकडी खेळण्यांची कला रुजली आणि भरभराटीला आली; मात्र या कलेने अनेक चढउतारही पाहिले. अनेकदा जवळपास नाहीशी होण्याच्या स्तरापर्यंत पोहोचण्याचे प्रसंग या कलाक्षेत्रावर आले. प्रत्येकवेळी सावंतवाडीच्या राजघराण्याकडून मिळालेल्या राजाश्रयामुळे ही कला पुन्हा उभारी घेत गेली. राजेसाहेबांच्या रूपाने या कलेला शेवटचा राजाश्रय मिळाला. तेव्हापासून आतापर्यंत या कलेच्या उत्कर्षाचा आलेख चढता राहिला आहे.
सावंतवाडीची ही लाकडी खेळणी ‘लाखकाम’ या नावाने ओळखली जायची. ही लाखकला सावंतवाडीत १७ व्या शतकात आली. १८ व्या आणि १९ व्या शतकात ती विकासाच्या शिखरावर पोहोचली. लाखकामाचे वर्गीकरण साधारण तीन विभागांत केले जाते. यात हाताच्या चरख्यावर लाकडाची कलाकृती फिरवत त्यावर लाखेच्या कांडीने रंग चढवून त्याला केवड्याच्या पानाने चकाकी आणण्याचा पहिला, लाकडी व इतर वस्तूंच्या पृष्ठभागावर वेलबुट्ट्या व आकृत्या रंगविण्याचा दुसरा, तर निरनिराळ्या वस्तूंवर वेलबुट्ट्या आणि देवदेवतांची चित्रे रंगामध्ये गोंद आणि पाणी मिसळून चितारण्याचा तिसरा प्रकार येतो. रंगकाम टिकावे म्हणून लाख किंवा इतर उपयुक्त पदार्थांचे मिश्रण यावर चढविले जायचे. ही कला आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्वान १७ व्या शतकात येथे घेऊन आल्याचे उल्लेख आढळतात.
मधल्या काळात सावंतवाडीची ओळख बनलेली ही कला अडचणीत होती. कलाकार नसल्याने याची निर्मिती कमी झाली होती. यासाठीची बाजारपेठ मर्यादित होती. राजेसाहेब आणि राणीसाहेबांनी ही स्थिती ओळखली. या कलेतील रोजगारनिर्मितीचे सामर्थ्य त्यांना माहीत होते. यामुळे त्याला ‘ग्लोबल’ करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. यासाठी ‘सावंतवाडी लॅकर वेअर्स’ या संस्थेची १९५१ मध्ये स्थापना केली. दोन पातळींवर काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. यात कलाकार शोधून ही कला मोठ्या प्रमाणात पुनर्जीवित करायची होती. शिवाय चांगली बाजारपेठ शोधायची होती. यातील कला पुनर्जीवित करण्याचे आव्हान मोठे होते. ‘गंजिफा’, हा या कलेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्यांनी यातील निपुण, जाणकार कारागिरांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी केवळ एकच वृद्ध कलाकार असल्याचे लक्षात आले. ते वर्षातून केवळ दोनच सेट बनवत असत. राजेसाहेबांनी त्यांना ही कला शिकविण्यासाठी नियुक्त केले. त्यांच्याकडून स्वतः राजेसाहेब आणि राणीसाहेबांनी ही कला शिकून घेतली. समाजातील सर्व स्तरातील तरुणांना याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. राणीसाहेब तर लाखकाम, हातकाम, विणकाम, भरतकाम यातील निपुण कारागीर बनल्या. या सर्व प्रकारांत त्यांनी राज्यस्तरावर पुरस्कार मिळविला. शिवाय त्यांनी शिकविलेल्या कारागिरांनीही राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली. यामधून तरुण कलाकारांची एक फळी तयार झाली. प्राचीन चित्रकृतींमध्ये सुधारणा घडवून आणि त्याच्या तंत्रज्ञानात आवश्यक बदल करून नवीन आकृती शोध आणि विकास हा संशोधनाचा एक वेगळा विभाग करून त्यावर काम करण्यात आले. तज्ज्ञ कारागिरांना नियुक्त करून या संस्थेतर्फे उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. या कलेच्या विकासावर लक्ष केंद्रित करत पारंपरिक चित्रकृती आणि लाखकाम केलेले फर्निचर निर्माण करण्याचे कामही या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.
राजेसाहेब आणि राणीसाहेब या आधी अनेक देशांमध्ये गेल्या होत्या. तेथील कला आणि मार्केट याचा त्यांना चांगला अभ्यास होता. त्यांनी लाकडी खेळण्यांच्या, गंजिफाच्या मार्केटसाठीही जगभराचा अभ्यास केला. प्रसंगी यासाठी परदेशात जाऊन तेथील ज्ञान घेतले. परदेशातील मार्केटशी थेट संपर्क निर्माण केला. यामधून अमेरिका, नॉर्वे, बेल्जियम, पश्‍चिम जर्मनी, जपान, हाँगकाँग आदी देशांमधील बाजारपेठ मिळविण्यात त्यांना यश आले. येथील गंजिफाला जागतिक वस्तूसंग्रहालये, मोठ्या व्यक्तींची वैयक्तिक संग्रहालये या ठिकाणी मानाचे स्थान मिळाले. या दाम्पत्याने लाखकलेसाठी दिलेले हे योगदान सिंधुदुर्गाच्या कलाक्षेत्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठे म्हणावे लागेल. आजही सावंतवाडीच्या राजवाड्यात गंजिफा व ही लाखकला विस्तारण्यासाठी कलाकार घडविले जातात आणि कलाकृती निर्माण केल्या जातात. या क्षेत्राने गेल्या ७० वर्षांत खूप मोठा विस्तार केला आहे. या सगळ्याची नवी सुरुवात राजेसाहेब आणि राणीसाहेबांनी केली.
.................
चौकट
चार कलाकारांची संयुक्त कलाकृती
सावंतवाडीच्या राजघराण्याने दिलेल्या आश्रयामुळे अनेक हस्तकला बहरल्या. यातील सगळ्यात जास्त ‘इंटरेस्टिंग’ गोष्ट म्हणजे चित्रकाराबरोबर सुतार, सोनार व कशिदा काढणारे जीनगर असे चार कलावंत एकत्र येऊन संयुक्त कौशल्यातून सर्वोत्तम हस्तकलेच्या कलाकृती घडवत असत. हा सर्वाधिक उत्कर्षाचा काळ होता. दुर्दैवाने कारागिरांच्या एकमेकांमधील गैरसमजुतीतून व समन्वयाअभावी ही अव्वल लोककला पुढच्या काळात लोप पावली, असेही राजेसाहेबांना संशोधनातून आणि अभ्यासातून लक्षात आले होते..