सदर-कोकण आयकॉन

सदर-कोकण आयकॉन

लोगो ः कोकण आयकॉन
---
94663
सतीश पाटणकर
--


शिक्षणशास्त्रज्ञ
रामभाऊ परुळेकर

लीड
रामभाऊ विठ्ठल परुळेकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळे या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण परुळे, वेंगुर्ले व मालवण येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण, पदवी व पदव्युत्तर शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालय मुंबई येथे झाले. महाविद्यालयामध्ये त्यांचे अभ्यासाचे विषय भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे होते. त्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्या मिळाल्या व आपले शिक्षण पूर्ण करता आले. १९१२ मध्ये मालवणच्या टोपीवाला विद्यालयाने त्यांना सन्मानाने मुख्याध्यापक म्हणून आमंत्रित केले. त्यामुळे शाळाही मोठ्या लौकिकास पात्र ठरली. शाळेच्या या लौकिकामुळे टोपीवाला या दानशूर कुटुंबाकडून मोठी देणगी मिळाली. त्याचा विनियोग शाळेसाठी जमीन व इमारतीसाठी करता आला.
- सतीश पाटणकर
.................
रामभाऊ परुळेकर यांना इंग्लंडला जाऊन स्नातकोतर शिक्षणशास्त्राच्या पदवीसाठी टोपीवाला यांच्याकडून १९२२ मध्ये शिष्यवृत्ती मिळाली. ‘मुंबई इलाख्यातील शैक्षणिक प्रश्न’ या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला. इंग्लंडच्या वास्तव्यात जॉन अॅडॅम व टी. पर्सी यांसारख्या प्रसिद्ध शिक्षण शास्त्रज्ञांच्या हाताखाली त्यांना शिकण्याची संधी मिळाली. टोपीवाला महाविद्यालयामधून ते निवृत्त झाले, त्याचवर्षी त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीच्या सचिवपदी नेमणूक मिळाली. पुणे येथील शिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथील शिक्षण महाविद्यालय, सावंतवाडी संस्थानचे शैक्षणिक सर्वेक्षण अशी महत्त्वाची कामे त्यांच्या हातून पार पडली. १८२० ते १८३० या काळात मुंबई प्रांतात शिक्षणाविषयी जी धोरणे आखण्यात आली आणि त्यानिमित्ताने जो ब्रिटिश अधिकाऱ्यांत पत्रव्यवहार झाला, त्याचे प्रकाशन त्यांनी दोन खंडात केले. परुळेकरांनी ज्या विविध संस्था उभारल्या, त्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन (१९४८) ही एक महत्त्वाची संस्था होय. या संस्थेचे ते पहिल्यापासून संचालक होते. अध्यापन, संशोधन, प्रकाशन आणि शैक्षणिक प्रयोग या शिक्षण क्षेत्राच्या विभागाचे उल्लेखनीय कार्याचे श्रेय परुळेकरांना देणे उचित होईल. ग्रामीण शिक्षणाला महत्त्व देणारी एक प्रयोगशील संस्था ‘मौनी विद्यापीठ’ त्यांनी सुरू केले. मौनी विद्यापीठाने चांगला विकास केला. भारत सरकारने मान्यता दिलेल्या निवडक दहा संस्थांपैकी मौनी विद्यापीठ हे एक आहे.
परुळेकर हे एक उत्तम शिक्षक व संशोधक होते. त्यांची व्याख्याने अभ्यासपूर्ण तर असतच; शिवाय मनोरंजकही असत. ते उत्तम संशोधन मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक एम.एड. व पीएच.डी. विद्यार्थ्यांना यशस्वीरीत्या मार्गदर्शन केले. नारायणराव टोपीवाले स्मारक शैक्षणिक संशोधन मालेचे त्यांनी पुनर्जीवन व विकास केला. या संस्थेमार्फत त्यांनी शिक्षणासंबंधी पाच खंड प्रसिद्ध केले. परुळेकरांचा शिक्षणशास्त्रज्ञ म्हणून भारतभर लौकिक झाला. प्रांतिक शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते. अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळाचे व विधीसभेचे ते प्राध्यापक, सभासद होते. पुण्याच्या शालांत परीक्षा मंडळाचे ते अनेक वर्षे सभासद होते. मुंबई शहर समाज शिक्षण संस्था, प्रौढ शिक्षण समिती, सोशल सर्व्हिस लीग व अशाच अन्य प्रौढ शिक्षणाशी संबंधित संस्थांशी परुळेकरांचा घनिष्ट संबंध होता. १९५४ मध्ये पाटणा येथे आयोजित केलेल्या प्रौढ शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. चेन्नईचे मुख्यमंत्री राजगोपालचारी यांनी प्राथमिक शिक्षणासंबंधी एक नवी योजना तयार केली होती. तिचे परीक्षण करण्यासाठी जी समिती नेमली गेली, तिचे अध्यक्षपद परुळेकर यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. परुळेकरांना पाठ्यपुस्तकांचे महत्त्व माहीत होते. त्यांनी साने, मोडक, रेगे, आजगावकर, रुबेन यांच्या सहकार्याने भूगोल, अंकगणित, इंग्रजी या विषयांवर दर्जेदार पुस्तके लिहिली व बाजारात त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. मुंबईतील मुलांसाठी त्यांनी साक्षरता शिक्षणावर पुस्तके लिहिली.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com