बेळगाव ः जिल्हा बातमी

बेळगाव ः जिल्हा बातमी

बेळगाव जिल्ह्यात
काँग्रेसला साथ
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १३ ः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्का देत बेळगाव जिल्ह्यातील अठरा पैकी अकरा जागांवर काँग्रेसने विजय मिळविला तर भाजपला सात जागांवरच समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील सहा मराठीबहुल मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने एकाकी लढत दिली; मात्र एकाही मतदारसंघात समितीला यश मिळाले नाही. यमकनमर्डी, चिक्कोडी, अथणी, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर, सौंदत्ती-यल्लम्मा, कुडची, कागवाड, बैलहोंगल, रामदुर्ग, कित्तूर या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.
राज्यात गेली चार वर्षे भाजपची सत्ता असतानाही बेळगाव जिल्ह्यात कॉँग्रेसने मिळविलेले यश उल्लेखनीय आहे. बंगळूर शहरानंतर बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील जागा वाढविण्याचा प्रयत्न भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून झाला होता. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली. मागील निवडणुकीत जिल्ह्यात भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या; पण २०१९ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून रमेश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसचे तीन आमदार भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ पाच वर आले होते. निवडणूक काळात भाजप उमेदवारांसाठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकाच दिवसात तीन सभा व दोन रोड शो घेतले. याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्री, महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ जिल्ह्यात ठाण मांडून होते; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभा घेतल्या. त्या सभांचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला दहापेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला होता, तो दावा खरा ठरला. २०२१ मध्ये झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जारकीहोळी यांनी घेतलेली मते पाहता काँग्रेसला संधी मिळेल, असे चित्र निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत ते खरे ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com