
मळेवाड़ केंद्रामध्ये डॉक्टरसाठी शिरसाट यांचा उपोषणाचा इशारा
मळेवाड केंद्रामध्ये डॉक्टरसाठी
शिरसाट यांचा उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः मळेवाड-कोंडुरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक झाली नसल्याने संपूर्ण परिसरासाठी गंभीर बाब निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही आरोग्य केंद्रात डॉक्टरची नेमणूक करण्यात येत नसल्याने माजी पंचायत समिती सदस्य सीताराम उर्फ बाळा शिरसाट यांनी २२ मे रोजी सकाळी ८ वाजता आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिरसाट यांनी म्हटले आहे की, जबाबदार डॉक्टर नसल्याने गरोदर माता रुग्णालयात दाखल होत नाहीत. यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना जागा अपुरी पडत असे. शेतकरी वर्गातील गरोदर मातांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. आरोग्य केंद्राची सद्स्थितीत दुरवस्था झाली आहे. जबाबदार व्यक्ती म्हणजे एमबीबीएस आरोग्य अधिकारी नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने डॉक्टरची नेमणूक करावी; अन्यथा २२ मे रोजी सकाळी ८ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१२ ते २०२३ या कालावधीत शासनाचा निधी कोणत्या कामावर खर्च झाला, याची माहिती मिळावी, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांनी पाठविल्या आहेत.