
समर्थ प्रतिष्ठानतर्फे रांगणागडाची स्वच्छता
समर्थ प्रतिष्ठानतर्फे गडाची स्वच्छता
कुडाळः गडकिल्ले हे जसे इतिहासाचे प्रतीक आहे, तसेच त्यांची स्वच्छता व देखभाल ठेवणे हे प्रत्येक गड किल्लेप्रेमीचे कर्तव्य आहे. या प्रेरणेतूनच धर्मवीर संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून समर्थ प्रतिष्ठान, डोंबिवलीमार्फत दुर्गतीर्थ रांगणागडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समर्थ प्रतिष्ठानने तेथील रांगणाई देवी मंदिर, महादेव मंदिर तलावाकाठी असलेला परिसर स्वच्छ केला. त्यांच्या या उपक्रमात समर्थ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष उत्तम जाधव, अध्यक्ष सुमन जाधव, सचिव सानिका जाधव, खजिनदार आनंद नाईक, विश्वस्त जीवन साळुंखे, दीपाली भुयाळ, शैलेश बावकर, मनीषा भाटकर, मिलन कानडे, किरण कानडे, गोविंद सावंत, नागेश सावंत, संदेश आरेकर, संतोष नाईक, सुमित राणे, अर्थ माताळे, समर्थ जाधव, रावजी नाईक नंदिनी नाईक आदी सहभागी झाले.
----------------
कांदळगाव विद्यामंदिरचे यश
मालवणः तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव, तालुका मालवण या माध्यमिक शाळेमधून एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी भूमिका कोचरेकर आणि राज जुवाटकर या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे नितीन परब आणि संचिता परब हे दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या परीक्षेत आठवीतील सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यामधील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
---------------------
प्रज्ञाशोधमध्ये हिंदळे शाळेचे यश
मालवणः चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत हिंदळे नंबर १ शाळेची सातवीतील विद्यार्थिनी आर्या राणे हिने देवगड तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिला २२० गुण प्राप्त झाले. हिंदळे-भंडारवाडी शाळेची सातवीतील विद्यार्थिनी मृगाक्षी हिर्लेकर हिने देवगड तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिला २१० गुण प्राप्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची आवड लागावी, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. आर्या व मृगाक्षी यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे.
----------------
तुळसला १९ पासून जैतिर जत्रोत्सव
वेंगुर्लेः दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान तथा तुळस ग्रामदैवत श्री जैतिर देवाचा वार्षिक जत्रोत्सव १९ मेपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त गेले १५ दिवसांपासून तुळस देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने नियोजनाचे काम हाती घेतले आहे. यात मंदिरांची रंगरंगोटी व मंदिर परिसरातील अन्य वास्तूंची दुरुस्ती सुरू आहे. देवस्थान समितीने स्वयंसेवकांच्या बैठका बोलावून कमिट्या नेमत त्यांच्यावर पुढच्या नियोजनाची जबाबदारी सोपविली आहे. राऊळ घराण्याकडून देवाचे रुपडे (मुखवटा) देवघरात आणल्यानंतर धार्मिक कार्याला सुरुवात झाली. यावर्षी जैतिर व कवळास मेमध्येच येत असल्याने गर्दीचा उच्चांक होणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
------------------
सातोसे माऊलीचा आज वर्धापन दिन
सावंतवाडीः सातोसे येथील श्री देवी माऊली मातेचा वर्धापन दिन उद्या (ता. १५) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजल्यापासून लघुरुद्र, अभिषेक दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता महिलांचा फुगडी कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांचे भजन, ७ वाजता पालखी प्रदक्षिणा व दीपोत्सव, रात्री १० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष वसंत धुरी व ग्रामस्थांनी केले आहे.
................