बुरंबावडेत विधवा महिलांचा सन्मानद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुरंबावडेत विधवा महिलांचा सन्मानद
बुरंबावडेत विधवा महिलांचा सन्मानद

बुरंबावडेत विधवा महिलांचा सन्मानद

sakal_logo
By

०२८५०

बुरंबावडेत विधवा महिलांचा सन्मान
कुणबी समाजाचा उपक्रम : स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १४ ः बुरंबावडे येथील कुणबी स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभात समाजातील विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.
या स्नेहसंमेलनाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने झाले. स्थानिक व मुंबईतील कुणबी समाजबांधवांच्या मुलांनी महामानवांच्या चरित्रावर वक्तृत्व सादर केले. यानंतर किशोर व युवा कलाकारांचे चित्रकला प्रदर्शन प्रस्तुत करण्यात आले. दुपारनंतर महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभासोबतच बुरंबावडे गावातील सर्व समाजातील विधवांचा शाल, श्रीफळ देऊन कुणबी समाज बुरंबावडे या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी नशाबंदी महाराष्ट्र राज्य मुंबईच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी संदर्भात मार्गदर्शन केले. तंबाखूमुक्त अभियान, तळेरेच्या प्रमुख श्रावणी मदभावे यांनी स्त्री स्वातंत्र्य व स्त्रियांना आधुनिक संगणक शिक्षणाची माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगून या व्यसनापासून मुक्तता कशी साधता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. विधवांच्या सन्मानाची आवश्यकता प्रतिपादन केली.
पत्रकार उदय दुदवडकर यांनी कुणबी समाज मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचा आपल्या मनोगतातून गौरव केला. विधवा महिलांचा सन्मान हा महामानवांच्या कर्तृत्वाचा, क्रांतीचा आणि आदर्शाचा अर्थात महामानवांचा सन्मान असल्याचे उद्‌गार त्यांनी काढले. अकाली वैधव्यप्राप्त तरुण महिलांच्या पुनर्विवाहाचा विचार करून त्यांना पुन्हा प्रपंच साधण्याची संधी देण्यास आणि त्यांचे पुनर्विवाह जमवून घडून आणण्यास समाजाने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुलांची नृत्ये, महिलांचे समई नृत्य आदी कार्यक्रम झाले. कुणबी समाज बुरंबावडेच्या भजनाने या कुणबी स्नेहसंमेलनाची सांगता झाली.