
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात दुसरी
swt१४१२.jpg
२८६२
मुंबईः राज्यस्तरावरील दुसरा क्रमांक स्विकारताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे व अन्य.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात दुसरी
ग्रामस्वराज्य अभियानात उत्कृष्ट कामगिरी ः शासनाकडून मुंबईत सन्मान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य व्यवस्थेमधील कार्यरत लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी उपक्रमामध्ये आयोजनाबाबत उत्कृष्ट कामगिरी करून ग्रामीण लोकशाही मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. याबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जिल्हा परिषदेचा मुंबईत सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्य प्रकल्प संचालक राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्य पुणे व संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे यांच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधित प्रशिक्षण उपक्रम, पेसा कायदा अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण तसेच संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाच्या उद्देशाने जाहीर केलेल्या जागतिक कार्यक्रम २०३० पर्यंत १७ शाश्वत विकासाची धेय्य साध्य करण्याच्या उद्देशाने विकास आराखड्यामध्ये नऊ संकल्पना समाविष्ट करण्यासाठी तालुका व ग्राम पातळीवर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन केले होते. जिल्हा परिषद व राज्याच्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, मुख्य सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय कर्मचारी, ग्राम संसाधन गटाचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे अध्यक्ष व सचिव, पेसा मोबीलाईझर, ग्रामसभा मोबीलाईझर अशा जिल्ह्यातील विविध घटकांना प्रशिक्षण देण्याचे यशस्वी आयोजन केले होते. त्याबाबत शासनाने राज्यात दुसरा क्रमांक जाहीर करीत जिल्हा परिषदेचा सन्मान केला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, विस्तार अधिकारी पी. आर. फाले, जिल्हा व्यवस्थापक परेश परब, तत्कालीन कर्मचारी सरोजिनी गुराम, सारिका पावसकर तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली होती. या सर्वांचे यशस्वी कामगिरी बद्दल प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी अभिनंदन केले आहे.