चिपळूण - महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा जुलैमध्ये लागणार कस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा जुलैमध्ये लागणार कस
चिपळूण - महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा जुलैमध्ये लागणार कस

चिपळूण - महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा जुलैमध्ये लागणार कस

sakal_logo
By

फोटो
KOP23M02900
चिपळूण ः परशुराम घाटातील धोकादायक प्रवास टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून उपायोजना सुरू आहेत. (मुझफ्फर खान सकाळ छायाचित्रसेवा)

महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा जुलैमध्ये कस
परशुराम घाटातील वाहतूक ; रस्ता मोकळा करण्यास प्रशासन सज्ज
चिपळूण, ता. १४ ः मुसळधार पावसामुळे गेली दोन वर्ष वारंवार ठप्प होणारा परशुराम घाट यंदा सज्ज झाला आहे. घाटातील वाहतूक यावर्षी बंद पडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू आहे. मात्र जुलै महिन्यातील पावसाळ्यात महामार्ग विभागाच्या उपायोजनांचा कस लागणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. रस्त्याचा भाग खचल्यामुळे तसेच डोंगर खाली आल्यामुळे येथे मोठे अपघातही झाले आहेत. रस्त्यावर अचानक मोठे दगड यायचे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. काही काळ रस्ता बंद ठेवून चिरणी आंबडस मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. दोन वर्षात झालेल्या घटनांची पुनरावृती होऊ नये यासाठी महामार्ग प्राधिकारण विभाग आणि चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीकडून पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना केल्या आहेत. घाटात नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. डोंगर कटाई करून मातीचा भराव सुरू आहे. सध्या विना अडथळा एकेरी मार्ग चालू आहे. धोकादायक डोंगर, कोसळणारे धोकादायक भाग कापणे, गटारे मोकळी करण्याचे काम चालू आहे. तसेच सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. दुहेरी मार्ग तयार करताना मातीचा भराव करून रस्ता उंच करणे गरजेचे होते. मातीचा भराव करण्यासाठी पंधरा दिवस दिवसभऱ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. घाटात ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे. अशा ठिकाणच्या दरडी काढण्यात आल्या आहेत. घाटात डोंगराच्या बाजूला संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत. डोंगर खाली आला तर त्याची माती रस्त्यावर येऊ नये यसाठी संरक्षण भिंतीच्या मागील बाजू रिकामी ठेवण्यात आली आहे. ज्या भागात रस्ता खचत आहे. तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील जमीन खचण्याचा धोका कमी झाला आहे. डोंगरमाथ्यावरुन येणारे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातून नैसर्गिक पद्धतीने वाहून जाण्यासाठी स्वतंत्र गटारे बांधण्याचे नियोजन आहे. त्याचेही काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी तीव्र उतारावर वाहने रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. अशा भागात बॅरकेटिंग बसविण्याचे काम सुरू आहे. या सर्व उपायोजनांचा पावसाळ्यात कस लागणार आहे. कारण जुलै महिन्यात चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतो. घाटातील अनेक भागात डोगरची माती भुसभुशीत झाली आही ती खाली येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.


कोट
परशुराम घाटात पावसाळ्यात कोणताही अपघात होऊ नये. पावसाळ्यात अखंडित आणि विना अपघात प्रवास करता यावा यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहेत. अपघात होणे आपल्या हाती नाही त्यातूनही कोणती दुर्घटना घडली, तर रस्ता मोकळा करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
- अमोल माडकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग महाड