वृत्तबद्ध कवितेसाठी हवे भाषाज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तबद्ध कवितेसाठी हवे भाषाज्ञान
वृत्तबद्ध कवितेसाठी हवे भाषाज्ञान

वृत्तबद्ध कवितेसाठी हवे भाषाज्ञान

sakal_logo
By

02983
सावंतवाडी ः वृत्तबद्ध कविता व गझल कार्यशाळेचे प्रशिक्षक कवी, गझलकार विजय जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना ॲड. संतोष सावंत. शेजारी ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. यशोधन गवस, प्रतिभा चव्हाण, मेघना राऊळ, अभिमन्यू लोंढे आदी.

वृत्तबद्ध कवितेसाठी हवे भाषाज्ञान

विजय जोशी ः गझल कार्यशाळेस सावंतवाडीत प्रतिसाद


सावंतवाडी, ता. १५ ः अक्षरच्छंद वृत्त, मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, गझल शब्दबद्ध करता आली पाहिजे. त्यासाठी भाषेचे आकलन असायला हवे. वृत्तबद्ध कविता लिहिणे अत्यंत सोपे आहे; मात्र त्यासाठी वास्तव्याचे भान राखणे गरजेचे आहे. या गझल कार्यशाळेत ज्यांनी सहभाग घेतला, त्या सर्वांची पुढील दोन महिन्यांत व्हॉट्सअपवर कार्यशाळा घेतली जाईल. यातून निश्चितपणे दर्जेदार कवी समोर येतील, असे प्रतिपादन ‘वृत्तबद्ध कविता व गझल’चे प्रशिक्षक डोंबिवली येथील कवी विजय जोशी यांनी केले.
येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे काल (ता. १४) कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे एक दिवसीय ‘वृत्तबद्ध कविता व गझल कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्‍घाटन श्री. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रा. यशोधन गवस, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, ॲड. नकुल पार्सेकर, रामदास पारकर, कार्यशाळेचे संयोजक कवी दीपक पटेकर, मेघना राऊळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. गवस म्हणाले, ‘‘ही कार्यशाळा घेऊन निश्चितच चांगले काम केले आहे. विजय जोशी यांनी पुन्हा या भागात यावे. येथील उदयोन्मुख साहित्यिकांसाठी निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातील.’’ प्रास्ताविकात अध्यक्ष ॲड. सावंत यांनी ही कार्यशाळा घेण्यास कवी दीपक पटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेला जिल्ह्यासह गोवा-मडगाव आदी भागातून साहित्यिकांनी सहभाग दर्शविला. दरवर्षी नवोदित कवी घडविण्याच्या दृष्टीने अशी चळवळ उभारली जाईल, असे स्पष्ट केले. ॲड. पार्सेकर, कवी दीपक पटेकर, दिलीप भाईप, रामदास पारकर आदींनी विचार मांडले. अशा कार्यशाळांतून नवोदित कवी घडविण्याचे काम होणारच आहे; पण यातून आम्हाला चांगले शिकता आले. असा उपक्रम सातत्याने घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. समारोप कार्यक्रमांमध्ये या कार्यशाळेत ज्यांनी सहभाग घेतला, त्यांची इतिहासकार डॉ. जी. ए. बुवा यांच्या माध्यमातून कविता लेखन स्पर्धा तीन महिन्यानंतर घेतली जाईल. विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी चैताली चौकेकर, उज्ज्वला कर्पे, देवयानी आजगावकर, अमीर सातार्डेकर, आश्लेषा पारकर, आदिती मसूरकर, राधिका कांबळी, मेघना राऊळ, स्नेहा नारिंगणेकर, अलका कांबळे, राजेंद्र गोसावी, रामदास पारकर, रितेश राऊळ, डॉ. गौरी गणपत्ये, कृष्णा गवस, दिलीप भाईप, सौ. चव्हाण, उज्ज्वल सावंत, मधुकांत कद्रेकर आदी कवी-कवयित्री उपस्थित होते. मेघना राऊळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव चव्हाण, लोंढे यांनी आभार मानले.
---
साहित्य चळवळ रुजविण्याचे काम
यावेळी जोशी पुढे म्हणाले, ‘‘वृत्तबद्ध कविता लिहिणे तसे सोपे काम नाही; पण आपण ते सोपे करू शकतो. त्यासाठी आपले भाषेवर प्रभुत्व असायला हवे. भाषा अवगत असायला हवी. तरच सहजपणे आपण वृत्तबद्ध कविता लिहू शकतो. त्यासाठी मात्रा, अक्षर, गण या वृत्तांबाबत ज्ञान हवे. याबाबत लवकरच ऑनलाईन कार्यशाळा घेणार आहोत. त्या माध्यमातून वृत्तबध्द कविता कशी लिहिता येईल, हे शिकविले जाईल. या कार्यशाळेमुळे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ रुजविण्याचे काम केले. यातून कविता आणि लेखक घडविण्याचे काम होत आहे.’’