
कुडाळात दोन मोटारींची धडक
02986
कुडाळ ः येथे दोन मोटारींमध्ये झालेल्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले.
कुडाळात दोन मोटारींची धडक
महिला जखमी; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर येथील हॉटेल लेमनग्रास येथे दुभाजकामधील मिडलकटमधून मार्गस्थ होणाऱ्या मोटारीला सावंतवाडीहून कुडाळकडे येणाऱ्या मोटारीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात सावंतवाडीहून येणाऱ्या महिलेला किरकोळ दुखापत झाली. यात दोन्ही मोटारींचे नुकसान झाले.
मुंबई-गोवा महामार्गावरून सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने स्विफ्ट मोटार येत होती. यादरम्यान कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रासकडून सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी वॅगनार मोटार रस्ता ओलांडून दुभाजकांतील मिडलकटमधून मार्गस्थ होत असतानाच सावंतवाडीहून येणाऱ्या स्विफ्ट मोटारीची धडक वॅगनार मोटारीला बसली. यानंतर वॅगनार दुभाजकाच्या मध्येच अडकली. या अपघातात स्विफ्ट मोटारीतील महिलेला किरकोळ दुखापत झाली. तिला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर कुडाळच्या दिशेने येणारी वाहतूक काही वेळ खोळंबली होती. होमगार्ड विश्वजीत शेडगे व सौरभ जाधव यांनी पोलिस हवालदार शिंगाडे यांच्या उपस्थितीत वाहतूक पूर्ववत करून रस्ता मोकळा गेला. या अपघाताची उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.