ganja
ganjaesakal

Ganja Selling : चिपळुण शहरात खुलेआम होतेय गांजा विक्री; १४ ते १८ वर्षापर्यंतची मुले आहारी

चिपळूण शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे.
Summary

चिपळूण शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे.

चिपळूण - शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे. लांजा येथे गांजा सेवन करणाऱ्यांनी चिपळूणमधून गांजा विकत घेतल्याचे कबूल केल्यानंतर लांजा पोलिसांनी चिपळूणमधील दोघांना अटक केली आहे. त्यामुळे चिपळूण हे गांजा खरेदी-विक्रीचे केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगारापुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

चिपळूण परिसरातील १४ ते १८ वयोगटांतील मुले या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्‍चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. शहरातील काही ठिकाणे गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे. गांजा पिणारे अनेकजण शहराच्या मध्यवस्तीत बसून दररोज नशेच्या आहारी जात आहेत.

चिपळूणमधून जिल्ह्यात गांजाची विक्री केली जात आहे. चिपळूणमध्ये गांजा कुठून येतो. गांजाची विक्री करणारा मुख्य व्यापारी कोण? या बाबी अस्पष्ट आहेत. पोलिसांना गांजा तस्करांचा शोध घेणे यापूर्वी कठिण होते; मात्र लांजामध्ये गांजाचे सेवन करणाऱ्यांनी आपण चिपळूणमधून गांजा विकत घेतल्याचे सांगितल्यानंतर चिपळुणातील राकेश गोरिवले आणि सचिन चव्हाण या दोघांना लांजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघे कोणाची नावे सांगतात, यावरून गांजा तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव समोर येणार आहे.

खबरदारीची गरज

गांजा तयार करणाऱ्या, विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल, अशा कारवाईची गरज आहे. मुलांना नशेची सवय लागते. १४ ते १६ वयोगटांतील मुले या चुकीच्या गोष्टीकडे वळतात. त्यांना या गोष्टी सहज किंवा मित्राच्या, मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडून उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. मुलांसोबत चुकीच्या संगतीचा किंवा पिअर प्रेशरमुळे ही मुले या नशेच्या आहारी जातात. यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. या मुलांचे समुपदेशन करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लांजामध्ये गांजा विकणाऱ्यांची नावे समजल्यानंतर आम्ही चिपळूणमधील दोघांना पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ते दोघे कुणाची नावे सांगतात, त्यावर पुढील चौकशी अवलंबून आहे. तालुक्यात कुठेही गांजा विक्री होत असल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार करावी.

- रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com