
चिपळूण ः जलवाहिनी बदलण्याचे काम युद्धपातळीवर
-rat१५p१३.jpg
02997
चिपळूण ः चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात चिपळूण पालिकेची जलवाहिनी बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
जलवाहिनी बदलण्याचे काम युद्धपातळीवर
५० टक्के काम पूर्ण, बहादूरशेख नाका परिसराला टँकरने पाणीपुरवठा
चिपळूण, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गालगत असलेली चिपळूण पालिकेची जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शालोम हॉटेल ते पॉवरहाऊस दरम्यानचा पाणीपुरवठा मंगळवारी सुरळीत होईल; मात्र शालोम हॉटेल ते बहादूरशेख नाकादरम्यान उद्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी पालिकेचे पाच हजार लिटर क्षमता असलेले दोन टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
चिपळूण शहरात चौपदरीकरणांतर्गत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामात सुरवातीपासून महामार्गालगत असलेली पलिकेची पाईपलाईन त्रासदायक ठरली. महामार्गाचे काम सुरू असताना पालिकेची मुख्य जलवाहिनी अनेकदा फुटली. त्या वेळी जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून करण्यात आले; मात्र ही जलवाहिनी बदलण्यात आली नाही. पालिकेची जलवाहिनी तशीच ठेवून उर्वरित काम करण्यात आले; मात्र आता सर्व्हिस रोडचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा या कामात पाइपलाइनचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यासाठी ही मुख्य पाईपलाईन स्थलांतरित करावी लागणार आहे. यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्याप्रमाणे पालिकेने सोमवार (ता. १५) व मंगळवार (ता. १६) असे दोन दिवस कामाचे नियोजन केले आहे. या कालावधीत बहादूरशेख नाका ते पॉवर हाऊस महामार्ग परिसरासह परशुराम नगर, बेबल कॉलनी, रॉयल नगर, विरेश्वर कॉलनी इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार होता; मात्र जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर केल्यामुळे ५० टक्के पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बहादूरशेख नाका परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या अपार्टमेंटमधून मागणी होईल त्या भागाला पाणीपुरवठा केला जाईल.
------------
कोट
पालिकेने शालोम हॉटेल ते परशुराम नगर यादरम्यान असलेली जलवाहिनी महामार्गाबाहेर स्थलांतरित करण्याचे काम आजपासून सुरू केले. हे काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे परशुराम नगर बेबल कॉलनी, विरेश्वर कॉलनी, ओझरवाडी या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. उर्वरित भागाला टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. नागरिकांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे.
- नागेश पेठे, पाणी विभागप्रमुख, चिपळूण पालिका