
१५ संचालकपदांसाठी ९८ अर्ज
१५ संचालकपदांसाठी ९८ अर्ज
आज अर्ज छाननी; शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पंधरा संचालकपदांसाठी ९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या नवीन संचालकपदासाठी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी ९ मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची शेवटची मुदत होती. या पतसंस्थेसाठी एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी ९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांनी दिली.
दाखल उमेदवारी अर्जांची उद्या (ता. १६) छाननी होणार असून बुधवारी (ता. १७) वैध उमेदवारी अर्जांची अंतिम सूची जाहीर करण्यात येणार आहे. १७ ते ३१ मे हा कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. १ जूनला उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तर १५ जूनला आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार असून १६ ला मतमोजणी घेतली जाणार आहे. या पतसंस्थेसाठी एकूण १६७१ सभासद मतदार निश्चित झाले आहेत. दरम्यान, १५ जागांसाठी ९८ अर्ज आले असून ३१ मे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या दिवशी किती उमेदवार रिंगणात राहतात, हे निश्चित होणार आहे.
..............
चौकट
असे निवडले जाणार संचालक
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीसाठी एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये आठ तालुका मतदारसंघातून आठ संचालक निवडले जाणार आहेत. जिल्हा मतदार संघ खुला यासाठी दोन जागा असून अनुसूचित जाती जमाती सभासदांसाठी एक जागा राखीव आहे. दोन महिला प्रतिनिधींसाठी जागा राखीव असून इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एक, तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गामधून एक संचालक निवडला जाणार आहे.