शिक्षक पतपेढीत बाद मते वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक पतपेढीत बाद मते वाढली
शिक्षक पतपेढीत बाद मते वाढली

शिक्षक पतपेढीत बाद मते वाढली

sakal_logo
By

03101
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शिक्षक पतपेढी निकाल आपल्या बाजूने जाहीर होताच भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

शिक्षक पतपेढीत बाद मते वाढली

मतमोजणी पूर्ण; चार तालुक्यातील स्थिती

ओरोस, ता. १५ ः जिल्ह्यात कर्मचारी सहकार क्षेत्रातील मोठी संस्था म्हणून ओळख असलेल्या
प्राथमिक शिक्षक पतपेढीसाठी आज झालेल्या मतमोजणीत आठपैकी चार तालुक्यात मोठ्या संख्येने मते बाद ठरल्याचे समोर आले.
पतपेढीसाठी काल मतदान झाले होते. ही निवडणूक भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलमधील प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ विरुद्ध परिवर्तन सहकार पॅनेलमधील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य दिव्यांग शिक्षक संघटना, सत्यशोधक शिक्षक संघटना या संघटनांत झाली. आज याची मतमोजणी झाली. यात भाग्यलक्ष्मी पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रवेश होता. निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांनी सुरुवातीला अन्य सभासद कार्यकर्त्यांना प्रवेश दिला; परंतु वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांचा गोंधळ सुरू असल्याने या सर्वांना बाहेर काढण्याच्या सूचना श्रीमती यादव यांनी पोलिसांना दिल्या. त्यानुसार उमेदवार व प्रतिनिधी वगळता सर्वांना बाहेर काढण्यात आले.
या निवडणुकीत मतदार सभासदांची मते बाद ठरण्याचे प्रमाण जास्त होते. यात नोटाचा पर्य़ाय नव्हता. मतदारांनी आपली मते बाद होतील, अशाप्रकारे मतपत्रिकेवर शिक्के मारले. दोन्ही उमेदवारांच्या मधोमध अथवा उलटा शिक्का मारला. यात जिल्हा सर्वसाधारण मतदार संघ ५, जिल्हा महिला मतदार संघ ७, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग ८, अनुसूचित जाती जमाती ७, इतर मागास प्रवर्ग ५, वैभववाडी तालुका मतदार संघ १, वेंगुर्ले २, सावंतवाडी व कुडाळ प्रत्येकी २ अशी मते बाद झाली; मात्र मालवण, दोडामार्ग, कणकवली व देवगड या चार तालुका मतदार संघांत एकही मत बाद झाले नाही.
एकतर्फी विजय मिळविल्यानंतर प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, सचिव सचिन मदने, माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर राणे, चंद्रसेन पाताडे, अनंत राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. यावेळी परिवर्तन पॅनेलचे राजाराम कविटकर, म. ल. देसाई, के. टी. चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सहायक निबंधक ए. एल. हिर्लेकर, पी. एल. जाधव, एम. एस. धुमाळ, श्रीकृष्ण मळेकर, आर. आर. अरवंदेकर, श्रीमती एस. ए. ढवण, एन. एस. वज्रटकर, एन. आर. माळगावकर, पी. पी. साळगावकर, विक्रांत आरेकर, अतुल मालंडकर, शिवप्रसाद चौकेकर, एन. वाय. सातार्डेकर, के. एम. मालकर, नम्रता मलकर, सांवी शेटवे, राधिका हळदणकर, प्रमोद कांबळी, रुपेश मोरे, विलास सावंत यांनी मतमोजणी प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
................
कोट
आमच्या पॅनेलचा हा सलग पाचवा विजय आहे. पतपेढी निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांनी असंख्य आरोप आमच्यावर केले; परंतु शिक्षक मतदारांनी आमच्या कारभारावर विश्वास ठेवून त्यांचे आरोप फेटाळले. हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचे बळ हेच आजच्या विजयाचे गमक आहे.
- राजन कोरगावकर, पॅनेल प्रमुख, भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल
..............
कोट
नवनिर्वाचित संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. परिवर्तन पॅनलसाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचेच आभार. ७२ मालक सभासदांच्या हितासाठी व पतपेढीच्या उत्कर्षासाठी यापुढेही भक्कमपणे सातत्याने प्रयत्न करू. एकूण मतांमधील ४९.५७ टक्के मते परिवर्तन पॅनेलला, तर ५०.४३ टक्के मते भाग्यलक्ष्मी पॅनलला मिळाली आहेत.
- राजाराम कविटकर, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग