चिपळूण-वाशिष्ठीतील गाळ उपशाचे काम निधीअभावी ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-वाशिष्ठीतील गाळ उपशाचे काम निधीअभावी ठप्प
चिपळूण-वाशिष्ठीतील गाळ उपशाचे काम निधीअभावी ठप्प

चिपळूण-वाशिष्ठीतील गाळ उपशाचे काम निधीअभावी ठप्प

sakal_logo
By

- ratchl१५७.jpg
03031
चिपळूण ः डिझेलसाठी पैसे नसल्याने वाशिष्ठी नदीकिनारी उभे असलेले डंपर.

वाशिष्ठीतील गाळ उपसा निधीअभावी ठप्प

३५ लाख संपले; यंत्रसामग्रीसह डंपर काठावर

चिपळूण, ता. १५ ः नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू असून, त्यास जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून इंधनपुरवठा केला जात आहे. इंधनासाठी उपलब्ध झालेला ३५ लाखांचा निधी संपल्याने वाशिष्ठीतील गाळ उपशाचे काम सोमवारपासून थांबले आहे. वाशिष्ठी नदीत गाळ उपशाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवणार असल्याचे पालकमंत्र्यांनी वारंवार जाहीर केले; मात्र या प्रोजेक्टला निधी नसल्याने गाळ उपशाचे काम थंडावले आहे.
चिपळुणात आलेल्या २०२१च्या महापुरानंतर गेली दोन वर्षे वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा सुरू आहे. गतवर्षी शहरात उठाव झाल्यानंतर गतीने गाळ उपशाचे काम झाले; मात्र यावर्षीच्या कामास मोठी गती मिळालेली नाही. जलसंपदा यांत्रिकी विभाग शांत असताना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मात्र गाळ उपसा सुरू आहे. नाम फाउंडेशनला यंत्रसामग्रीसाठी इंधनपुरवठा जलसंपदा विभागाच्या अलोरे यांत्रिकी विभागामार्फत केला जात आहे. इंधनपुरवठ्यासाठी संस्थेला १ कोटी ३० लाख दिले जाणार होते. त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत १ कोटी २० लाखांचे इंधन पुरवले; मात्र थोडा निधी शिल्लक राहिल्याने आणि पुढील निधी कधी उपलब्ध होईल, हे सांगता येत नसल्याने नदीतील गाळ काढण्यासाठी तयार करण्यात केलेले अडथळे त्वरित काढून घेण्यात यावेत, अशा सूचना पाटंबधारे खात्याने नाम फाउंडेशनला गेल्या एप्रिल महिन्यात केल्या होत्या. अशातच गाळ उपसाच्या दुसऱ्या व पहिल्या टप्प्यातील शिल्लक कामासाठी ५ कोटी २१ लाखांचे अंदाजपत्रक यांत्रिकी विभागाकडून तयार केले असताना त्यातील ४ कोटी ८६ लाख खर्चास तीन महिन्यांनी नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे; मात्र हा निधी त्वरित मिळण्याची शक्यता नव्हती. गाळ उपसा थांबणार नाही, यादृष्टीने सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीकडून खेड, संगमेश्वरला मंजूर झालेला निधी तात्पुरत्या स्वरूपात चिपळूणला नाम फाउंडेशनला वर्ग केला.
चिपळूणच्या गाळ उपशासाठी १० कोटी २८ लाखांचा निधी आमदार शेखर निकम यांया माध्यमातून उपलब्ध झाला. गतवर्षी यातून सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या वाशिष्ठी नदीत गाळ उपसासाठी राज्यभरातून यंत्रसामग्री आणून जलसंपदाने गाळ उपसा केला; मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र संपूर्ण उन्हाळा कोरडा गेला आहे. विशेष म्हणजे गाळ काढणाऱ्या नाम फाउंडेशनलाही इंधनपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही. पावसाळा संपल्यानंतर गाळ उपशासंदर्भात मंत्रालय पातळीवर झालेल्या बैठकांत निधी देण्याच्या घोषणा झाल्या; मात्र प्रत्यक्षात शासनाकडून यावर्षी गाळ उपसासाठी एकही रुपया निधी मिळालेला नाही. सध्या नाम फाउंडेशनने यंत्रसामग्री लावून सध्या उक्ताड, पेठमाप आणि गोवळकोट आदी ठिकाणी ७ पोकलेन, २० डंपराच्या माध्यमातून गाळ उपसा सुरू होता; मात्र तो पूर्णपणे थांबला असून, यंत्रसामग्रीसह डंपर नदीकाठावर उभे आहेत.
००००००००००
दहा लाख मंजुरीचे पत्र
दरम्यान, उक्ताड पूल ते बाजारपेठ दरम्यान वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी दहा लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडे वर्ग केल्याचे पत्र जिल्हाधकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. त्यामुळे थांबलेल्या कामाला लवकरच वेग येणार आहे.