टर्मिनस पूर्ण न झाल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टर्मिनस पूर्ण न झाल्यास आंदोलन
टर्मिनस पूर्ण न झाल्यास आंदोलन

टर्मिनस पूर्ण न झाल्यास आंदोलन

sakal_logo
By

03159
सावंतवाडी : स्टेशन मास्तरांना निवेदन देताना शांताराम नाईक, यशवंत जड्यार, भरत पंडित, मिहिर मठकर, सुनील गावडे आदी.

टर्मिनस पूर्ण न झाल्यास आंदोलन

सावंतवाडी येथे इशारा; प्रवासी संघटनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः टर्मिनसचा दर्जा मिळूनही सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ठराविक गाड्यांना थांबा मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम २०२४ पर्यंत पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे (मुंबई) अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिला. रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी टर्मिनसला कोणत्या सुविधा दिलेल्या ते लेखी स्वरूपात कळवावे, सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, आदी मागण्याही संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.
येथील रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना नाईक यांच्यासह सेक्रेटरी यशवंत जड्यार, भरत पंडित, मिहिर मठकर आदींनी निवेदन दिले. त्यानंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा कोकण रेल्वे विभागात टर्मिनस असा उल्लेख असल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र अपुऱ्या सुविधांमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासीय चाकरमन्यांना याचा काहीच फायदा होत नाही. याचा फायदा दक्षिणेतील गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांना झाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षे अर्ज, विनंत्या करूनही याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सावंतवाडी टर्मिनस झाल्यास सर्व गाड्या थांबाव्यात लागतील. टर्मिनस नसल्याने वसई-सावंतवाडी गाडी सुरू केली जात नाही. सद्यस्थितीत शंभर रेल्वे गाड्या मार्गावर धावत असून त्या येथून केवळ धूळ उडवून जात आहेत, त्याचा कोकणातील प्रवाशांना कोणताही फायदा नाही. दक्षिणेकडील राज्यांना मात्र याचा फायदा झाला आहे.’’
श्री. जड्यार म्हणाले, ‘‘रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सुसज्ज असे सावंतवाडी टर्मिनस व्हावे, अशी आग्रही मागणी केली आहे. कोकण रेल्वेला २५ वर्षे होत असताना याचा लाभ दुर्दैवाने कोकणवासीयांना झालेला नाही. याउलट दक्षिणेतील राज्यांना या सुपरफास्ट गाड्यांचा फायदा अधिक होत आहे. कोकण रेल्वे व रेल्वे बोर्डाकडे पॅसेंजर गाड्या व स्लो दर्जाच्या गाड्यांची मागणी केली आहे. कोकणातील प्रत्येक स्थानकावर त्या गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी आहे. सावंतवाडी टर्मिनस मार्गी लागल्यास रेल्वे प्रवाशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे टर्मिनस सुरू होऊन कोकणातील भूमिपुत्रांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’
यावेळी संघटनेचे भरत पंडित, शेखर बागवे, बाळ वेळकर, सागर तळवडेकर, विहंग गोठस्कर, सिद्धेश सावंत, वेत्ये माजी सरपंच सुनील गावडे, माजगाव माजी सरपंच आबा सावंत, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनोद ठाकूर, प्रशांत बुगडे, संदीप पांढरे, संतोष गावडे, बाळू गावडे, सत्यवान गावडे, सुभाष मयेकर, सुशील चौगुले, शरद जाधव, दशरथ पेडणेकर, सतीश पाथरूट, मिलिंद दहीवले, राजाराम आळवे, अमिता आजगावकर आदी उपस्थित होते.
--
सावंतवाडी टर्मिनससाठी प्रयत्नशील
श्री. मठकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि गाड्या थांबविण्याबाबत आम्ही गेले काही दिवस निवेदने देऊन माहिती अधिकाराचा उपयोग करत आहोत. टर्मिनसचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यास सर्व गाड्या इथे थांबतील. सध्या हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्या रेल्वेंना येथे थांबा आहे. त्यामुळे टर्मिनसचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी कृती समिती पुनर्जीवित करून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना एकत्रित घेऊन कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर करतानाच सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.’’