आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज
आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज

sakal_logo
By

९ (पान २ साठी)

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज

आपत्ती नियंत्रण कक्षासह ग्रामकृती दल स्थापन

गुहागर, ता. १६ ः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी गुहागर प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका पातळीवर आपत्ती नियंत्रण कक्ष तर ग्रामस्तरावर ग्रामकृती दल स्थापन करण्यात येणार आहे.
याबाबतची मान्सूनपूर्व बैठक तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या अध्यक्षतेखाली पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या वेळी अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होणे, दरडप्रवण गावात दरड कोसळणे, समुद्रकिनारी व नदीकिनारच्या गावात पूरस्थिती, चक्रीवादळ, खारभूमी बंधारे अतिवृष्टीने वाहून जाणे, भूस्खलन, रस्ते खचणे, धरणक्षेत्रातील संभाव्य धोका, साथीचे रोग अशा संभाव्य आपत्तीला तालुका प्रशासनाला तोंड द्यावे लागते. या आपत्ती निवारणासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
समुद्रकिनारची अंजनवेल, आरे, गुहागर, असगोली, पालशेत, अडूर, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरीआगर, हेदवी, नरवण, तवसाळखुर्द, तवसाळ, पडवे, कुडली अशा गावांमध्ये चक्रीवादळ, पूरस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकिनारची अडूर, पालशेत, आरे, वेलदूर, नवानगर येथील ग्रामस्थांना इतर ठिकाणी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे. मौजे कारूळ गावातील झालेल्या भूस्खलनामध्ये ३८ घरांचे पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. धोकादायक पर्यटन स्थळांमध्ये गुहागर समुद्र, बामणघळ हेदवी, स्थानिक तळी यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरडप्रवण क्षेत्रातील वेलदूर गावातील घरटवाडीतर्फे वेलदूर, नवगाव सिद्धेश्वरनगर, नवानगर विठ्ठलवाडी, धोपावे गावातील तरीबंदर गुरववाडी, कोळीवाडीतर्फे चाळकेवाडीतर्फे धोपावे, तेटले, अंजनवेल पेठ, भोईवाडी, पालशेत आगडीमंदिर चिंचबंदर वाडीखाते सावरपाटी, हेदवी -पालशेत तवसाळ रस्ता, आंबेरेखुर्द ब्राह्मणवाडी रस्ता, आंबेरे-पाचेरी आंबेरेवाडी रस्ता, पाचेरीआगर काजोळकरवाडी रस्ता कोंडवाडी, भातगांव-मासू आंबेरे असोरे, काजुर्ली कुंभारमळा येथील रस्ते व वस्त्यांना दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरडग्रस्त भागातील लोकांना जि. प. शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर सभागृह, महाविद्यालये अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. या बैठकीला तालुका प्रशासनातील महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रत्येक गावाचे सरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
---
धरणातील गाळ काढणे गरजेचे

मोडकाआगर धरणातील पाण्यावरती परिसरातील गावे अवलंबून आहेत. पाण्यासारखा महत्वाचा प्रश्न असल्याने या धरणातील गाळ संबंधित खात्याने लवकरात लवकर काढावा जेणेकरून भविष्यात परिसरातील गावांची पाणी समस्या सुटेल, असे पाटपन्हाळेचे उपसरपंच आसीम साल्हे यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सूचित केले.