जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट
जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट

जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट

sakal_logo
By

03210

जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट

चिंताजनक स्थिती; देवगडमध्ये सर्वाधिक १९.४० टक्के प्रमाण

सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट कायम असून त्याचे प्रमाण चिंताजनक असे आहे. देवगड तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण (१९.४० टक्के) सर्वाधिक असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एप्रिल अखेर तपासण्यात आलेल्या एकूण ५१८ पाणी नमुन्यांपैकी ६० पाणी नमूने दूषित आढळले असून हे प्रमाण सरासरी ११.५८ टक्के एवढे आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पाणी नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. एप्रिल महिन्याच्या पाणी नमुने तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील दूषित पाण्याचे प्रमाण पाहता सरासरी ११.५८ टक्के एवढे असले तरी देवगड तालुक्यातील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक १९.४० टक्के असे चिंताजनक आहे.
सावंतवाडी तालुक्यात तपासण्यात आलेल्या ११९ पाणी नामुन्यांपैकी १९ पाणी नमुने दूषित (१५.९७ टक्के), वेंगुर्लेत ३६ पैकी ३ नमुने दूषित (८.३३ टक्के), कुडाळ तालुक्यात १०८ पैकी ३ दूषित (२.७८ टक्के), मालवणमध्ये ३० पैकी २ नमूने दूषित (६.६७ टक्के), कणकवली तालुक्यातील १२९ पैकी १९ नमूने दूषित (१४.७३ टक्के), वैभववाडीत २१ पैकी १ पाणी नमूने दूषित (४.७६ टक्के), तर दोडामार्ग तालुक्यात केवळ ८ पाणी नमुने तपासले असून त्यामध्ये दूषित पाणी नमुना मिळाला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने पाणी नमुने तपासण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या जलदुतांमार्फत दर महिन्याला काही ठराविक भागातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाणी नामुन्यांची तपासणी करून हे पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य आहेत की अयोग्य, याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत देण्यात येतो. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास ते जलस्रोत शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. दूषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे बघण्यासाठी पुन्हा नमुने तपासण्यात येतात. त्यानंतरच पिण्यासाठी पाणी वापरले जाते; मात्र जिल्ह्यातील दूषित पाण्याचे संकट कायम आहे. हे प्रमाण पाहता वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हे दूषित पाणी जलजन्य आजारांचे कारण ठरू शकते.
................
कोट
जिल्ह्यात उन्हाळ्याचा कालावधी सुरू आहे. पाण्याची पातळी घटली असून पाणी वापरही वाढला आहे. अशावेळी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून या मागची कारणे शोधून उपाय योजना करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत. साथीचे आजार पसरणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी
--
दूषित पाण्याची टक्केवारी
सावंतवाडी - १५.९७
वेंगुर्ले - ८.३३
कुडाळ - २.७८
मालवण - ६.६७
कणकवली- १४.७३
वैभववाडी - ४.७६
दोडामार्ग - ०