देवगड हापूस मावळतीकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड हापूस मावळतीकडे
देवगड हापूस मावळतीकडे

देवगड हापूस मावळतीकडे

sakal_logo
By

03211
देवगड ः येथील बाजारात भात बियाणे उपलब्ध झाले आहे. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगड हापूस आंबा हंगाम मावळतीकडे

खरिपाची तयारी; भात बियाण्यास शेतकऱ्यांकडून मागणी

देवगड, ता. १६ ः हापूस आंबा हंगाम मावळतीच्या दिशेने असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. खरीप हंगामाच्या अनुषंगाने येथील बाजारात भात बियाणे विक्रीस उपलब्ध झाले आहे. पारंपरिक आणि संकरित अशा दोन्ही जातींची बियाणी विक्रेत्यांकडे आली असून शेतकऱ्यांकडून त्याला मागणी नोंदवली जात आहे.
हापूस आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. वातावरणात बदल होऊन केव्हाही मान्सूनपूर्व पाऊस बरसण्याची शक्यता गृहित धरून आंबा काढणीचा वेग वाढला आहे. त्यातच काही बागायतदारांकडील आंबा संपुष्टात आल्याने अशा शेतकर्‍यांचे आता खरीप हंगामाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आता खरीप हंगामाच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उन्हाळ्यात जमीन कोळपणी करून ठेवल्यास पहिल्या पावसात भात बियाणे पेरणी केल्यास वेळीच तरवा उगवून शेतीच्या कामांना गती देणे शक्य होते. यासाठी काही शेतकरी आतापासूनच बियाणे खरेदी करतात. पाऊस केव्हाही येण्याची शक्यता गृहित धरून नियोजन करण्यावर शेतकर्‍यांचा भर असतो. यासाठी बाजारात विविध प्रकारचे भात बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये संकरित, सुधारीत भात बियाण्यांचा समावेश आहे. अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात असल्याने जादा उत्पन्न मिळवून देणारे बियाणे वापरण्याकडे कल आहे. शेतीमध्ये व्यावसायिक धोरण अवलंबणारेही काही प्रगतशील शेतकरी आहेत. शासनाच्या भातपीक स्पर्धेतही सहभागी होणारे शेतकरी आहेत. अशावेळी अधिक उत्पन्न मिळणारे भात बियाणे शेतकरी वापरताना दिसतात. काही शेतकरी आपल्याला वर्षाकाठी पुरेल एवढे भात राखीव ठेवून उर्वरित तांदुळ विक्री करीत असल्याचेही चित्र आहे. यावरून शेतीमध्ये आधुनिकीकरण होत असल्याचे दिसते.
.................
चौकट
भाजीपाला बियाण्यासही मागणी
बाजारात भात बियाण्यांबरोबरच भाजीपाला बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये काकडी, भेंडे, पडवळ, दोडकी, वांगी यासह अन्य भाजीपाला बियाणे विक्रीस उपलब्ध झाले आहे. अनेकजण घराच्या परिसरात भाजीपाला बियाणे पेरतात. ग्रामीण भागात शेतीबरोबरच भाजीपाला उत्पादन घेऊन त्याची विक्री केली जाते. सामान्य नागरिकांबरोबरच हॉटेल व्यावसायिक भाजीपाला खरेदी करीत असल्याने भाज्यांना मोठी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे अशा भाजीपाला बियाण्यांनाही मागणी असल्याचे दिसून येत आहे.