‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सावंतवाडीत स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सावंतवाडीत स्वागत
‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सावंतवाडीत स्वागत

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सावंतवाडीत स्वागत

sakal_logo
By

03234
सावंतवाडी ः येथील रेल्वे स्थानकावरून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावली, तो क्षण.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे सावंतवाडीत स्वागत

स्थानकावर हिरवा झेंडा; प्रवासी, संघटना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सावंतवाडी, ता. १६ ः ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची कोकण रेल्वे मार्गावर आज चाचणी घेण्यात आली. मुंबई ते मडगाव अशी ही सुपरफास्ट एक्स्प्रेस धावली. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर धूळ उडवत जाणारी ही रेल्वे प्रत्यक्षात पाहण्याचा आणि तिचे स्वागत करण्याचा योग प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आला. येथील रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर यांनी या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला.
मुंबई ते मडगाव या मार्गावर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. त्या गाडीची आज चाचणी घेण्यात आली. ती चाचणी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. सावंतवाडी स्थानकावर सव्वा अकराच्या दरम्यान ही गाडी मार्गस्थ झाली. यावेळी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जड्यार, भरत पंडित, सुनील गावडे, आबा सावंत, मिहीर मठकर आदी पदाधिकारी या रेल्वेच्या स्वागतासाठी थांबले होते. यावेळी स्टेशन मास्तरांना संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रवासी संघटना अध्यक्ष नाईक म्हणाले, ‘‘सावंतवाडीमध्ये टर्मिनस असते, तर या गाडीला थांबा आजच मिळाला असता; मात्र यासाठी आता प्रवाशांना आंदोलन करावे लागणार आहे. सुमारे शंभर गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतात, मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच गाड्यांना येथे थांबा आहे. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस झाल्यास सर्वच रेल्वेंना येथे थांबा मिळेल.’’ यावेळी माजी आमदार जयंत मठकर यांचे नातू रोट्रॅक्टर अध्यक्ष मिहीर मठकर यांनी देखील ''वंदे भारत''सारखी जलद धावणारी गाडी सावंतवाडीत थांबायला हवी, तरच पर्यटन विकास जलद गतीने होईल, असे मत व्यक्त केले.