
वैभववाडीत ‘त्या’ बांधकामाला नोटीस
03222
वैभववाडी ः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने चिकटविलेली नोटीस.
वैभववाडीत ‘त्या’ बांधकामाला नोटीस
महसूलची जागा; लोकेंच्या तक्रारीची तहसीलदारांकडून दखल
वैभववाडी, ता. १६ ः शासकीय गोदामानजीकची सर्व्हे क्रमांक ३६/१ ही जागा महसूल विभागाची असून या जागेत विनापरवाना सुरू असलेले बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी नोटीस महसूल विभागाने नगरपंचायतीला दिली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी देखील नोटीस लावण्यात आली आहे. या बांधकामासंदर्भात ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली होती.
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व्हे क्रमांक ३६/१ मध्ये सध्या रस्त्याकडेला बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी स्टॉलधारकांसाठी पक्के स्टॉल उभारण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. स्टॉलधारकांसाठी तात्पुरत्या शेड उभारण्यासाठी सर्व्हे क्रमांक ३०, ३१, ३२, ३३ मध्ये परवानगी मिळावी, असा अर्ज तहसीलदारांकडे दिला होता; परंतु या अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदारांनी अशा प्रकारची परवानगी देण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचे नगरपंचायतीला कळविले आहे. याशिवाय जागेचा ताबा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा, असा सल्ला देतानाच सध्या सर्व्हे क्रमांक ३६/१ मध्ये सुरू असलेले विनापरवाना अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे, अशी सूचना देखील केली आहे. याशिवाय महसूल विभागाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणची जागा महसूल विभागाची मालकीची असून या जागेत कुणीही अतिक्रमण करू नये, अशी नोटीस चिकटविली आहे.
शासकीय जागेत अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख लोके यांनी तहसीलदारांकडे केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी ही कारवाई केली. महसूलच्या नोटिशीनंतर बांधकाम थांबविण्यात आले आहे.
................
चौकट
अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
शासकीय जागेत अनधिकृतपणे केलेले बांधकाम नगरपंचायतीने तत्काळ काढून टाकावे, अशी सूचना महसूलने केली असून यापुढे सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम करू नये. आवश्यक असल्यास शासकीय जमीन मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून जमीन प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.