
रत्नागिरी ः ‘थ्रिप्स’वर कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करावे
PNE१२C७८०८५
PNE१४G०३७४६ संग्रहित
थ्रिप्सवर कोकण कृषी विद्यापिठाने करावे संशोधन
आंबा बागायतदार ; औषधे अनुदानावर देणारी योजना बनविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः हवामानातील बदलांमुळे हापूसवर मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला. त्यावर आवश्यक कमी दरातील औषधे उपलब्ध नाहीत. याबाबत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करणे गरजेचे आहे; मात्र तसे आतापर्यंत झालेले नाही. बागायतदारांची परिस्थिती लक्षात घेऊन थ्रिप्सवरील औषध कमी दरात कसे उपलब्ध होईल यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बागायतदार निशांत सावंत, दीपक राऊत यांच्यासह अन्य बागायतदारांनी केली.
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना बागायतदार म्हणाले, यंदा वातावरणातील बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे. थ्रिप्समुळे डागी आंब्यांचे प्रमाण अधिक आहे. हापूसवर उद्भवणारे रोग नियंत्रित करणारे औषधेच बाजारात उपलब्ध नाही. द्राक्ष किंवा अन्य भाजीपाल्यांवर वापरली जाणारे औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ती महाग असल्यामुळे बागायतदारांना परवडत नाहीत. त्यासाठी कोकण कृषी विद्यापिठाने विशेष संशोधन करायला हवे. अनेक कंपन्या बागायतदारांना औषधे पुरवतात. त्यावर वारेमाप खर्चही होतो. प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यांच्यावर शासनाकडून रोख लावला जात नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून जिल्हा आंबा उत्पादक संघ यामध्ये लक्ष घालणार आहे. संघाची परवानगी घेतल्याशिवाय औषधांची खरेदी-विक्री होणार नाही या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. शासनानेही बागायतदारांना अनुदानावर औषधे उपलबध करून देणार्या योजना सुरू केल्या पाहिजेत. यासाठी आंबा बोर्ड सुरू करण्यासाठी निर्णय घेतला पाहिजे.
पत्रकारांशी बोलताना उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, निशांत सावंत यांनी कोकण कृषी विद्यापिठाविषयी नाराजी व्यक्त केली. विद्यापिठाचे मुख्य कार्यालय दापोलीत असून हापूसचे सर्वाधिक क्षेत्र हे राजापूर, रत्नागिरी, गुहागर पट्ट्यात आहे. त्यांचे संशोधन किंवा झाडांवरील रोगराई याकडे प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन संशोधन होत नाही. यासाठी या भागामध्ये संशोधन केंद्र असले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
----
चौकट
शेतीवर आधारित उद्योग आणा
रिफायनरी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोधच राहील, असे आंबा बागातयदार बावा साळवी यांनी सांगितले. प्रकल्पामुळे शेती, बागायती संकटात सापडणार आहे. त्यामुळे हा विरोध असल्याचे स्पष्ट केले. कोकणात शेतीवर आधारित उद्योग आले पाहिजेत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उत्पादन कमी असल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निशांत सावंत यांनी सांगितले.
--
चौकट
प्रक्रिया क्लस्टर चालवायला घेणार
पावस येथे आंबा प्रक्रिया क्लस्टर उभारण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान घेण्यात आले आहे. ते क्लस्टर सध्या बंद अवस्थेत आहे. त्याचा उपयोग स्थानिक बागायतदारांसाठी करता येऊ शकतो; परंतु तसे झालेले नाही. दिवसाला २०० टन आंबा प्रक्रिया करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. रत्नागिरीतील आंबा तिथे प्रक्रियेसाठी आणला गेला तर स्थानिक शेतकर्यांना त्याचा फायदा होईल आणि कॅनिंगच्या आंब्याला हमीभाव मिळेल; परंतु तो जाणूनबुजून बंद ठेवण्यात आला आहे. हा प्रकल्प चालवायला मिळावा, अशी मागणी जिल्हा उत्पादक संघ करणार असल्याचे निशांत सावंत यांनी सांगितले.