
ः सलग दुसऱ्या दिवशीही यंत्रसामुग्री नदीकाठावरच
२७ ( पान ३ साठीमेन)
दुसऱ्या दिवशीही यंत्रसामुग्री नदीकाठावरच
तीन लाखाचा निधी नाही आला हाती ; वाशिष्ठीतील गाळ उपसा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः शहरातून जाणाऱ्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा इंधन निधी संपल्याने थांबला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी १० लाखाचा निधी जलसंपदा यांत्रिकी विभागाला उपलब्ध करून दिला आहे; मात्र हा निधी मंगळवारीही वितरित न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही नाम फाउंडेशनची सारी यंत्रसामुग्री नदीकाठावर उभी आहे.
नदीतील गाळ उपसा या दुसऱ्या व पहिल्या टप्प्यातील शिल्लक कामासाठी ५ कोटी २१ लाखाचे अंदाजपत्रक यांत्रिकी विभागाकडून तयार करण्यात आले असताना त्यातील ४ कोटी ८६ लाखाच्या खर्चाला तीन प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे; मात्र हा निधी उपलब्ध झालेला नाही. नाम फाउंडेशनला यंत्रसामुग्रीसाठी इंधन पुरवठा जलसंपदा विभागाच्या अलोरे यांत्रिकी विभागामार्फत केला जात असून आतापर्यंत इंधन पुरवठ्यासाठी गतवर्षाच्या शिल्लक रक्कमेतून संस्थेस १ कोटी ३० लाख दिले गेले; मात्र हा निधीही संपल्यानंतर गाळ उपसाचे काम थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीकडून खेड, संगमेश्वरला मंजूर झालेला ३५ लाख ७२ हजाराचा निधी तात्पुरत्या स्वरूपात चिपळूणला नाम फाउंडेशनला वर्ग केला; मात्र रविवारी तोही निधी संपल्यानंतर सोमवारपासून फाउंडेशनने उक्ताड, पेठमाप आणि गोवळकोट आदी ठिकाणी ७ पोकलेन, २० डंपरांच्या माध्यमातून गाळ उपसा करणारी यंत्रसामुग्रीसह डंपर नदीकाठावर उभे आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी वाशिष्ठी नदीतील उक्ताड पूल ते बाजारपेठ पुलापर्यंतच्या गाळ उपशासाठी पूरनियंत्रण कामासाठीच्या १५ लाखाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देत त्यातील १० लाखाचा निधी अलोरे यांत्रिकी विभागाला इंधनासाठी उपलब्ध करून दिला; मात्र तरीही मंगळवारी इंधन न मिळाल्याने नाम फाउंडेशनचा गाळ उपसा थांबलेला असून यंत्रसामुग्रीही नदीकाठावर उभी करून ठेवण्यात आली आहे.