
संक्षिप्त
जिल्ह्यातील ३७ रस्त्यांच्या
कामांसाठी ११४ कोटींचा निधी
रत्नागिरी, ता.१६ ः मागील अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १२१ किलोमीटर रस्त्यांच्या बांधकामासाठी १०५ कोटी २० लाख रुपये आणि दुरुस्तीसाठी आठ कोटी ८१ लाख रुपये, असा एकूण ११४ कोटी रुपयांचा निधी नियोजन विकास विभागाकडे मंजूर झाला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत एकूण ३७ रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास पुढील काळात सुखकर होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडणार्या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांची अक्षरश: चाळण झाली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिक अनेक वर्षे प्रतीक्षा करीत होते. हे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव अंतिम मान्यता व निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यानुसार तांत्रिक मान्यतेनंतर ३७ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ११४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.