बॅ. नाथ पैंचे नाव ‘चिपी’ला द्या
03352
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत. शेजारी काका कुडाळकर, अनंत पिळणकर, भास्कर परब आदी.
बॅ. नाथ पैंचे नाव ‘चिपी’ला द्या
‘राष्ट्रवादी’ची मागणी; पाठपुराव्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०१९ ला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर वर्षभराने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळातला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दिवंगत बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘जिल्ह्यातील ‘चिपी’ विमानतळाला थोर स्वातंत्र्य सेनानी बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा देशपातळीवर उमटविला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे जिल्ह्यातील चिपी विमानतळाला त्यांचे नाव देऊन आपल्या भूमिपुत्राच्या स्मृती जतन करणे जिल्हावासीयांना शक्य होईल.’’
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सरचिटणीस भास्कर परब, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओठवणेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.
--
राज्य सरकारचा ठराव केंद्राकडे
‘चिपी’ला नाथ पैंचे नाव देण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने केला असून १ फेब्रुवारीला तो केंद्राकडे देखील पाठविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सुरू ठेवला आहे. जिल्हाधिकारी म्हणून याबाबत पाठपुरावा करून चिपी विमानतळाला बॅ. पै यांचे नाव देण्याची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.