योजनांबाबत कामगारांना अनेक अडचणी

योजनांबाबत कामगारांना अनेक अडचणी

योजनांबाबत कामगारांना अनेक अडचणी

प्रसाद गावडे; सोमवारी सिंधुदुर्गनगरीत ‘ठिय्या’

ओरोस, ता. १७ ः महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना मंडळाकडून विविध योजना जाहीर करण्यात आल्या; मात्र कामगारांना प्रत्यक्षात त्यांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून यामुळे आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी कामगारांकडून प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात कामगार कार्यालय व मंडळाच्या सुविधा केंद्राकडे व्यथा मांडूनही दखल घेतली जात नसल्याने कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी व प्रलंबित प्रश्नांसाठी स्वाभिमानी कामगार संघटनेतर्फे सोमवारी (ता. २२) सकाळी अकराला सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात लक्षवेधी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
या संदर्भात संघटनेने सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंडळाकडील शैक्षणिक, साहाय्य, आरोग्य विषयक, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा व अन्य योजनांचे प्रस्ताव महिनोंमहिने तपासले जात नाहीत. परिणामी कामगारांचे लाभ प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. मंडळाच्या सुविधा केंद्राकडून लाभाच्या प्रस्तावांमध्ये चुकीच्या व मनमानी पद्धतीने त्रुटी काढल्या जात असून अर्जांची वेळीच तपासणी होत नाही. कामगारांना कार्यालयात सततचे हेलपाटे मारावे लागत असून लाभाचे प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने नामंजूर केले जात असल्याचा कामगारांचा आरोप आहे. सुविधा केंद्रस्तरावर लाभ प्रस्तावातील त्रुटीची कामगारांनी अनेकवेळा पूर्तता करून देखील प्रस्ताव त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. कामगारांच्या नोंदणी-नूतनीकरण विषयक ऑनलाईन अर्जांमध्ये चुकीच्या व मनमानी पद्धतीने तारखांबाबत त्रुटी दाखवून अर्ज नामंजूर केले जात असून त्यामुळे कामगारांना नाहक आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत जेवण सुविधा पुरविणे उपक्रमात अनेक अनियमितता असून पुरविले जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत कामगारांच्या तक्रारी आहेत. मध्यान्ह भोजन वितरण योजनेतील त्रुटींबाबत पुरवठादार संस्थेवर नियंत्रण ठेवणे, मध्यान्ह भोजन योजनेपासून वंचित कामगारांना लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून व वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशा मागण्या संघटनेने निवेदनातून कामगार अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या आहेत. कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा होऊन कामगारांचा त्रास कमी व्हावा. तसेच शिष्यवृत्ती लाभाचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मंजूर होऊन दिलासा मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून यात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही गावडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com