
राजापुरात 4 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान
राजापुरात ४ ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान
नऊ उमेदवार रिंगणातः २ हजार ५५ मतदार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या ३८ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा १४ जागा एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, तर १५ जागा बिनविरोध झाल्या. चार ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत असून त्यात नऊ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या पोटनिवडणुकीसाठी गुरूवारी (ता.१८) मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले आहे.
या निवडणुकीत मतदानामध्ये ९२७ पुरुष आणि ११२८ महिला असे २ हजार ५५ मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये कोणत्या उमेदवाराच्या बाजूने मतदारांचा कौल राहणार याकडे आता सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. नाटे येथील प्रभाग ४ मधील सर्वसाधारण स्त्री आरक्षण असलेल्या एका जागेसाठी दोन उमेदवार, अणसुरे येथील प्रभाग ३ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेल्या एका जागेसाठी तीन उमेदवार, दळे येथील प्रभाग १ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेल्या एका जागेसाठी दोन उमेदवार, काजिर्डा येथील प्रभाग ३ मधील सर्वसाधारणसाठी आरक्षित असलेल्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत. नाटे येथे २४९ पुरुष आणि ३२२ महिला असे ५७१ मतदार, अणसुरे येथे २५१ पुरुष आणि ३६७ महिला असे ६१८, दळे येथे २३० पुरुष आणि २२३ महिला असे ४५३ तर काजिर्डा येथे १९७ पुरुष तर २१६ महिला असे ४१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
चौकट
दृष्टिक्षेपात राजापूरची पोटनिवडणूक
* पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती ः २०
* एकूण जागा ः ३८
* बिनविरोध जागा ः १५
* अर्ज प्राप्त नसलेल्या जागा ः १४
* निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती ः ४
* निवडणुका होत असलेल्या जागेवरील उमेदवार ः ९