आंबा, काजूच्या कोकणात रेशीम शेतीला चालना

आंबा, काजूच्या कोकणात रेशीम शेतीला चालना

rat१७p८.jpg
०३३१९
राजापूरः रेशीमच्या कोषांसमवेत प्रगतशील शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, हनुमंत विचारे, सुधीर पालकर आदी.

rat१७p९.jpg
२३M०३३२०
रेशीमच्या अळ्या.

rat१७p१०.jpg
०३३१२
बेडवर अळ्या आणि तुतीचा पाला.

आंबा, काजूच्या कोकणात रेशीम शेतीला चालना
रेशीम संचालनालयाचा प्रस्तावः लांजा-राजापुरात तुतीची यशस्वी लागवड
राजेंद्र बाईतः सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः कोकणात राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून तुती लागवडीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर रेशीम शेती केली जात आहे. शेतकऱ्यांचा हा रेशीम शेतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी झालेला असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम संचालनालयाने कोकणाकरिता स्वतंत्र रेशीम विभागाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. स्वतंत्र रेशीम विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यात येणार आहे. जगभरामध्ये हापूस आंबा, काजू पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात रेशीम शेतीला चालना मिळणार आहे.
नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांच्या राजापूर-लांजा येथील शेतकऱ्यांनी केलेली तुती लागवड आणि रेशीम शेतीला भेट दिल्यानंतर कोकणाकरिता स्वतंत्र रेशीम विभाग उभारण्याच्या हालचालींना खऱ्या अर्थाने वेग आला. रेशीम संचालयानालयातर्फे सादर केलेल्या स्वतंत्र कोकण विभाग रेशीम कार्यालय निर्माण करण्याच्या प्रस्तावात आस्थापनानिहाय कर्मचारी संख्यादेखील नमूद करण्यात आली आहे. शेतीत विविध नवनवीन प्रयोग करून शेतीला ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूहगटाची स्थापना केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष रेशीम निर्मितीवेळी सोडण्यात येणार्‍या रेशीम अळ्यांना खाद्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या पाल्यासाठी तुतीची लागवड केली आहे.
खरवते, सौंदळ, कोळंब, करक, गोठणेदोनिवडे, ओझर, जांभवडे, आरगाव या ठिकाणी ही तुतीची सुमारे ७ एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. या शेतकर्‍यांना दापोलीतील कोकण कृषी विद्यापिठाच्या लांजातील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुदेश चव्हाण, महेश महाले, संदीप देशमुख यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. गडहिंग्लज अंडीपुंज निर्माण केंद्राचे रेशीम अधिकारी अनिल संकपाळ, ज्येष्ठ तांत्रिक सल्लागार डॉ. भगवान खंडागळे, माजी रेशीम विकास अधिकारी रमेश हांडे यांचेही त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. कोकणाकरिता स्वतंत्र रेशीम विभाग झाल्यास त्याचा फायदा या शेतकर्‍यांना होऊन भविष्यामध्ये कोकणात रेशीम शेती बहरण्यास निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहे.
रेशीम शेतीकरिता राज्याच्या इतर भागात मनरेगातून अनुदान देण्याची तरतूद आहे; मात्र, कोकण हा अपारंपरिक भाग असल्याने मनरेगा अनुदान योजनेची अंमलबजावणी होण्यात अडचणी आहेत. शेतकऱ्यांचा उत्साह पाहता राजापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी आणि विद्यमान तालुका कृषी अधिकारी सुहास पंडित यांनी मनरेगा मुल्यांकनाकरिता मनुष्यबळ पुरवण्यासाठी अपेक्षित सहकार्य करण्याचे आश्‍वासित दिले आहे. मनरेगाचा पर्याय उपलब्ध नसल्याने सिल्क समग्र-२ नावाच्या योजनेत टाईप-१ प्रकारातील शेड उभारण्यासाठी अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. सध्या शेतकरी शेड उभारणीसाठी बांबूचा उपयोग करत आहेत.
--------
चौकट
ए ग्रेडची कोषनिर्मिती
राजापूर-लांजा तालुक्यातील माजी सैनिक वासुदेव घाग, राजाराम पाटेकर, सुधीर पालकर, हनुमंत विचारे आणि अमर खामकर या प्रगतशील शेतकर्‍यांनी तुतीची लागवड करून त्या माध्यमातून कोकणात रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विविध समस्यांना सामोरे जातानाही त्यांनी सुमारे दोनशेहून अधिक अंडीपुंज आणि दीडशेहून अधिक कोषनिर्मिती केली. त्यामध्ये गोठणेदोनिवडे येथील युवा शेतकरी हनुमंत विचारे यांनी तब्बल २० अंडीपुंजमागे ४८० काऊंट असलेल्या ए ग्रेडची २२ किलो कोषनिर्मिती केली होती. विचारे यांच्या शेतामध्ये झालेली ही कोषनिर्मिती राज्यातील सर्वोत्कृष्ट कोषनिर्मिती असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

कोट
राजापूर-लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवड करून त्यातून केलेली रेशीम शेती निश्‍चितच गौरवास्पद आहे. रेशीम शेतीचा यशस्वी ठरलेला नावीन्यपूर्ण प्रयोग कोकणातील शेती क्षेत्रासाठी भविष्यात दिशादर्शक आणि उत्पन्नाचा नवा पर्याय निर्माण करणारा ठरणार आहे. त्यासाठी कोकणसाठी स्वतंत्र रेशीम विभाग कार्यरत झाल्यास रेशीम शेतीसाठी मार्गदर्शक आणि शेतकऱ्यांना ताकद देणारा ठरणारा असल्याने त्यासाठी रेशीम संचालनालयाचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
- सुहास पंडित, राजापूर कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com