
पर्यटन व्यवसायातून रोजगार संधी
03391
कासार्डे ः येथे वार्षिक महोत्सवात मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रमोद जठार. (छायाचित्र : एन. पावसकर)
पर्यटन व्यवसायातून रोजगार संधी
प्रमोद जठार; कासार्डेत वार्षिक महोत्सव उत्साहात
तळेरे, ता. १७ ः रिफायनरीसह पर्यटन व्यवसायामुळे येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी मुंबईकडे वळणारी पावले थांबणार आहेत. मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून कोकणातील रस्त्यांसाठी १० हजार करोड रुपये मंजुर झाले असून येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील तरुणांनी मुंबईकडे न जाता येथेच राहून रोजगाराभिमुख व्हावे, असे प्रतिपादन वार्षिक महोत्सवात माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. पिंपळेश्वर मंडळाला लवकरच सभामंडप बांधून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कासार्डे तर्फेवाडीमधील पिंपळेश्वर मंदिरात १४ ते १६ मे या कालावधीत वार्षिक महोत्सव सोहळा उत्साहात व जल्लोषात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जठार बोलत होते. हा वार्षिक महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रविवारी (ता. १४) महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री ''आचरा आनंद रंग'' हा श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजनचा रंगारंग कार्यक्रम रंगला. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सोमवारी (ता. १५) विविध धार्मिक कार्यक्रम व रात्री पियाळीचे बुवा संतोष कानडे, नाडण देवगडचे बुवा संदीप पुजारे, शेळपी वेंगुर्लेचे बुवा दिनेश वागदेकर यांच्यात तिरंगी सामना रंगला. भजनप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांनी याचा आस्वाद घेतला. बुना कानडे यांनी आपल्या भजनातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व प्रबोधन केले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (ता. १६) दहीकाल्याने सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामसेवक गजानन कोलते, पोलिस पाटील महेंद्र देवरुखकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजा पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर, प्रकाश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तर्फेवाडीतील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.