
कुर्धेतील पाणी योजना मंजूर असूनही रखडली
rat17p30.jpg
03398
कुर्धेः येथील सड्यावर पाणी योजनेचा लावलेला फलक.
------------
कुर्धेतील पाणी योजना
मंजूर असूनही रखडली
जलजीवन मिशन; वस्ती वाढू लागल्याने पाणीटंचाई
पावस, ता. १७ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे सड्यावर दिवसेंदिवस घरांची संख्या वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी योजना राबवण्याची मागणी गेली कित्येक वर्ष करण्यात येत होती. अखेर मेर्वी ग्रामपंचायतीने केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली. योजनेचा फलक लावण्यात आला, मात्र त्यासाठी बोरवेल खोदण्यात येणार होत्या, त्या अद्याप खोदल्या नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्धे सड्यावर दिवसेंदिवस वस्ती वाढत असल्यामुळे प्रत्येक जण विहिरी व विंधन विहिरी खोदत असल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे मे अखेर पिण्याचा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याकरिता मेर्वी ग्रामपंचायत तिकडे नळपाणी योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे जलजीवन मिशनंतर्गत सव्वा कोटीची नळपाणी योजना कुर्धे सडा- खोताचीवाडी, बंडबेवाडी आदी भागासाठी मंजूर करण्यात आली. त्यासाठी कुर्धे सडा येथे साठवण टाकी बांधण्याचा निश्चय करून त्या ठिकाणी फलक लावण्यात आला, परंतु त्याचे अद्याप उद्घाटनही झाले नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली. पाण्याबाबत त्यावेळी कातळावरील खाबतळे येथे दोन विंधन विहिरी मे अखेर पाडण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले, परंतु अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली न झाल्याबद्दल यावर्षी नळपाणी योजना होण्याची शक्यता नसल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.