
ग्लेन डिसोजा मृत्यूप्रकरणी सावंतवाडीत तपासाला वेग
ग्लेन डिसोजा मृत्यूप्रकरणी
सावंतवाडीत तपासाला वेग
सावंतवाडी, ता. १७ ः येथील पालिकेच्या स्विमिंग पुलात बुडून मृत्यू झालेल्या ग्लेन डिसोजा याच्या मृत्यूप्रकरणी येथील पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे. पोलिस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी मंगळवारी (ता. १६) घटनास्थळी जाऊन पाहणी करत उपस्थितांकडून माहिती घेतली. संबंधित ठेकेदारास कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही दिल्याचे मेंगडे यांनी सांगितले.
सावंतवाडी पालिकेच्या स्विमिंग पुलात युवकाचा बुडून मृत्यू झालेल्या प्रकरणाला तब्बल दहा दिवस उलटले, तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. मृत ग्लेनच्या वडिलांनी पोलिसांकडे अर्ज दिला असून या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. असे असताना तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दीर्घकालीन सुटीवर असलेले येथील पोलिस निरीक्षक मेंगडे सोमवारी (ता. १५) यांनी हजर झाल्यानंतर या घटनेची माहिती घेत काल पालिकेच्या स्विमिंग पुलाला भेट दिली. घटनेबाबत उपस्थित ठेकेदार व कामगार यांच्याकडून माहिती घेतली. घटनेनंतर घेतलेल्या जबाबात आणि काल मिळालेल्या माहितीत तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ठेकेदाराला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग मिळाला आहे.