युवा पिढीबाबत राष्ट्रसेवा दलाचे कार्य कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा पिढीबाबत राष्ट्रसेवा दलाचे कार्य कौतुकास्पद
युवा पिढीबाबत राष्ट्रसेवा दलाचे कार्य कौतुकास्पद

युवा पिढीबाबत राष्ट्रसेवा दलाचे कार्य कौतुकास्पद

sakal_logo
By

03441
कणकवली ः गोपूरी येथील व्यक्तिमत्व विकास शिबिरात झांज नृत्य प्रत्यक्षिकांतील शिबिरार्थी.


युवा पिढीबाबत राष्ट्रसेवा दलाचे कार्य कौतुकास्पद

प्रा. प्रवीण बांदेकर ः अद्वैत फाउंडेशनच्या शिबिराला प्रतिसाद

कणकवली,ता. १७ : अद्वैत फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार युवा पिढीकडे संक्रमित करण्याचे काम कौतुकास्पद आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसारखी छोटी छोटी बेटे राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून निर्माण होतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यीक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.
अद्वैत फाउंडेशन कणकवलीतर्फे गोपुरी आश्रम वागदे येथे ११ ते १५ मेस राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रा.बांदेकर बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्र सेवा दलचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, ‘अद्वैत’च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, आजरा माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित प्रभा वसंत, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, हरिहर वाटवे, विनायक मेस्त्री, विद्या राणे, बाबनी मापारी, चंदन माटुनगे, विजय होगन्नवार, सतीश सौदे, रोहित कुरणे, विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. बांदेकर म्हणाले, ‘‘व्यक्तीमत्व विकास म्हणजे आपल्या आचार आणि विचारांतील झालेले चांगले बदल. स्वतःची कामे स्वतः करत स्वावलंबी बनण्याचा धडा या शिबिरातून मिळतो. ‘अद्वैत’च्या माध्यमातून सरिता पवार आणि राजन चव्हाण यांनी सुरू केलेले कार्य देशात वेगवेगळ्या ठिकाणी अन्य संस्थांच्या माध्यमातून उभे राहिले तर भारत देश वैचारिक महासत्ता नक्कीच बनेल. देशात सध्या असलेले अराजकतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढे येणे हे कर्तव्य आहे. मुलांवर देशहिताचे चांगले संस्कार करतानाच सुसंस्कृत नागरिक म्हणून पालकांनी जगणे आणि इतरांना तसे जगण्यासाठी प्रवृत्त करणे ही आजच्या काळाची गरज आहे.’’ माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वसंत प्रभा म्हणाले की, माणुसकी हाच खरा धर्म असल्याची शिकवण या शिबिराच्या माध्यमातून बाल आणि युवा पिढीला देण्यात येत आहे. जात धर्म आणि पंथ विरहित मानवतेचा संदेश देण्याचे फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे. शिबिर समारोप प्रसंगी शिबिरार्थिंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सरिता पवार यांनी आभार मानले.
--
परदमोड करून शिबिरांचे आयोजन
राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ म्हणाले, ‘‘अद्वैत फाउंडेशन मानवतेचा विचार समाजातील सर्व जाती धर्मातील युवा पिढीला शिकवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे शिबिर सहा वर्षांपासून पदरमोड करून आयोजित करत आहे. जेव्हा राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरात सर्व जाती धर्माची मुले एकत्र येतात तेव्हा अखंड भारत देशाचे दर्शन होते, असे साने गुरुजी म्हणत असत. अद्वैत फाउंडेशन आयोजित या शिबिरात त्याची प्रचिती आली.