हत्तींनी त्रस्त केरवासीय करणार ''अन्नत्याग''

हत्तींनी त्रस्त केरवासीय करणार ''अन्नत्याग''

03451
दोडामार्ग ः मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस, केर उपसरपंच तेजस देसाई यांनी बुधवारी वनविभागाला निवेदन दिले. (छायाचित्र ः संदेश देसाई)

हत्तींनी त्रस्त केरवासीय करणार ''अन्नत्याग''
मनोबल खचल्याने पाऊल; २५ मे पासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ : शेती-बागायतीचे रानटी हत्तींकडून होणारे नुकसान रोखण्यास वनविभाग अपयशी ठरल्याने मनोबल खचलेल्या केर ग्रामस्थांनी २५ मेपासून गावातच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा वनविभागाला दिला. या संदर्भातील निवेदन आज दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना दिले.
यावेळी मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस व केर गावचे उपसरपंच तेजस देसाई उपस्थित होते. गावात हत्तीप्रश्न जटिल झाला असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. शासनाला वेळोवेळी सांगूनही ठोस उपाय योजना न झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करीत असून तातडीने मागण्यांचा विचार करून ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हत्तींच्या भीतीमुळे शेतकरी काजू बागायतीमध्ये जात नाहीत. फोन केल्यावर पंचनाम्यासाठी वनकर्मचारी येत नाही. नुकसान भरपाई अर्ज देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणे-येणे खर्चिक बाब आहे. वनविभाग पंचनामे वेळेत करीत नाहीत. पंचनामे केल्यास त्यामध्ये त्रुटी काढून वेळकाढूपणा केला जातो. शेतकरी, बागायतदारांना नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही. हत्तींना घाबरून पळताना जायबंदी झालेल्या ग्रामस्थांची विचारपूसही करण्यात आली नाही. रात्रीच्या वेळी मोर्ले, केर, घोटगेवाडी रस्त्यांवर हत्तींचे दर्शन नेहमीचीच बाब झाली आहे. त्यांना हुसकावून लावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कामावरून घरी येताना ग्रामस्थांना अचानक हत्ती रस्त्यावर आल्यास गाडी तिथेच टाकून पळावे लागते. परसबागांसह शेतीची दयनीय अवस्था झाली आहे. रात्री किंवा सकाळी कोणत्याही वेळी घरासमोर हत्ती येण्याची भीतीने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोणतेच सहकार्य नाही. वनविभागाकडून गंभीर घटना लपविल्या जात असल्याने त्यामुळे ग्रामस्थांचे खच्चीकरण होत आहे.
घोटगेवाडी, मोर्ले, केर रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी जाळी आवरण बसवून रस्ता सुरक्षित करावा, दिवसरात्र वनविभागाचे कर्मचारी तैनात करावेत, सेवेवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक संबंधित ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावणे, दूरध्वनीवरून नुकसान भरपाई, पंचनामे करण्याची प्रक्रिया स्वीकारून संबंधित अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी शेतकऱ्यास मिळावा, केर गावातील हत्तीचे वास्तव्य, झालेले नुकसान व केलेल्या उपाय योजना यांचा सविस्तर तपशील मिळावा. वरिष्ठ पातळीवर उपाय योजना करण्याचे ठरल्यानुसार गावपातळीवर केलेल्या उपाय योजनांचा तपशील द्यावा. ग्रामस्थांना येत असलेले भीतीदायक अनुभव व होत असलेले नुकसान याचा लेखी तपशील ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात यावा. ग्रामस्थांशी असहकार्याने वागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. आधुनिक यंत्रणेचा वापर करून हत्तींना शेतीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडावे. हत्तीबाधित गावांतील कुटुंबांना विमा संरक्षण द्यावे. हत्तींमुळे शेतकरी करत नसल्याने प्रति कुटुंब अनुदान जाहीर करावे. हत्ती पकड मोहीम राबवून त्यांना मूळ कर्नाटकच्या अधिवासामध्ये सोडावे. खोटे गुन्हे दाखल करण्याची शेतकऱ्यांत भीती असल्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण बैठकीत मिळावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे केर ग्रामस्थांनी केल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com