''जलसंधारण''चे सहा नवे प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''जलसंधारण''चे सहा नवे प्रकल्प
''जलसंधारण''चे सहा नवे प्रकल्प

''जलसंधारण''चे सहा नवे प्रकल्प

sakal_logo
By

03453
सिंधुदुर्गनगरी : येथे बुधवारी झालेल्या बैठकीत आढावा घेताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण.

''जलसंधारण''चे सहा नवे प्रकल्प
पालकमंत्र्यांची माहिती; जिल्ह्यात जल जीवन कामांना प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः जलसंधारण, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये जलसंधारण अंतर्गत सहा नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याची ६१४ कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी आवश्यक निधी देऊ. ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची गावनिहाय सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करून द्यावी. यामुळे जनतेला योग्य माहिती मिळेल, असेही त्यांनी सूचित केले.
पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात जलसंधारण अंतर्गत कामे, प्रलंबित कामे, भूसंपादन प्रक्रिया, ‘जलजीवन’ ची कामे, तिलारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा याचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांत प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अविशकुमार सोनोने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अधिकारी अजयकुमार सर्वगोड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘‘जलसंधारण प्रकल्पांच्या कामामध्ये प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी. संबंधित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे. जिल्ह्यात प्रलंबित ३९ प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधान्य द्यावे. यासाठी ४६५ योजनांचा कृती आराखडा तयार आहे. त्याची अंदाजपत्रकीय किंमत ४३० कोटी आहे. या सर्व योजनांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यातील ४९ कामे पूर्ण असून ६१४ प्रगतीपथावर आहेत. पूर्ण होणाऱ्या कामांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कुंटुंबाना नळ जोडणी करून देणे शक्य होणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘२०२३-२४ च्या पूरक आराखड्यामध्ये ६४ योजनांच्या कृती आराखड्याला मान्यता देण्यात येईल. यासाठी सुमारे २० कोटी ८३ लाख निधी दिला जाईल. तिलारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा योजनेंचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण असून उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासाठी निधीचा प्रस्ताव शासनास सादर करावा.’’
चौकट
''जल जीवन''च्या ६६५ योजना
मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी म्हणाले, ‘‘प्रत्येक ग्रामीण घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे, हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. देवगड तालुक्यात ७०, दोडामार्ग ५३, कणकवली १०४, कुडाळ १२४, मालवण १२६, सावंतवाडी ७८, वैभववाडी ५१, वेंगुर्ले ५९ अशा एकूण ६६५ योजनांचा कृती आराखडा तयार करून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यासाठी ४३० कोटी ८२ लाख इतका निधी लागणार आहे.’’