
आपत्ती व्यवस्थापन
44 (पान ३ साठीमेन)
- rat17p37.jpg-
23M03421
रत्नागिरी ः आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह. सोबत अन्य अधिकारी.
---------
आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा
जिल्हाधिकारी ; आढावा बैठकीत सतर्कतेच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 17 ः पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व शासकीय यंत्रण सज्ज ठेवा, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा, लघु व मध्यम प्रकल्पांची दुरुस्ती, ब्रिटिशकालीन पुलांची पाहणी व दुरुस्ती, धोकादायक इमारतींची माहिती घेऊन तेथील नागरिकांचे स्थलांतर अशा उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करा, जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर म्हणून सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिल्या. मुख्य कार्यालयात एसएमएस ब्लास्टर यंत्रणा असल्यामुळे सर्व मोबाईलधारकांना हवामानाच्या पूर्वसूचना प्रसारित केल्या जातात. लाईफ जॅकेट्स, लाइफ बोयाज व रिंगस, रबर बोट, होड्या आदी साहित्य उपलब्ध असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकारी, पर्जन्यमापक यंत्राची सद्यस्थिती तपासणी, धरणनिहाय संपर्क अधिकारी, वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवा, तालुक्यातील घाट परिसरात वारंवार दरडी कोसळून वाहतूक खंडित होत असल्याने तेथे संपर्क अधिकारी नेमणे, राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हामार्गावर झाडे व दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होऊ नये याची पूर्वतयारी करा, पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात धान्यसाठा करा अशा सूचना यंत्रणांना दिल्या. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांची संयुक्त पाहणी करून धरणांची आवश्यकता असल्यास पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करून घ्यावी. हायड्रोपॉवर प्रोजेक्ट कार्यरत असलेल्या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नद्यांच्या पाणीपातळीनुसार सोडण्याचे नियोजन करावे. धरणांवर वायरलेस यंत्रणा, व्हीएचएफ सेट बसवावा. धरणावर पर्जन्यमापक यंत्र स्थापित करावे आणि सावित्री व इतर उपनद्यांमधील गाळ काढावा.
असेही त्यांनी सांगितले.
----
धोकादायक इमारती, पुलांची वर्गवारी करा
ब्रिटिशकालीन जुन्या पुलांचे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तपासणी करून संबंधित पूल वाहतुकीस सक्षम असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयास तत्काळ सादर करावे. धोकादायक इमारती, पूल यांची वर्गवारी करावी. त्या इमारतींबाबत मान्सूनपूर्वीच योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.