बंद गाळ्यांमुळे पालिकेचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंद गाळ्यांमुळे पालिकेचे नुकसान
बंद गाळ्यांमुळे पालिकेचे नुकसान

बंद गाळ्यांमुळे पालिकेचे नुकसान

sakal_logo
By

03459
मालवण ः मच्छीमार्केटच्या इमारतीवरील गाळे लिलावाविना बंदावस्थेत आहेत.

बंद गाळ्यांमुळे पालिकेचे नुकसान

महेश कांदळगावकर; मच्छीमार्केट इमारतप्रश्नी शासनाचे लक्ष वेधणार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : येथील पालिकेच्या मच्छीमार्केट इमारतीवरील नवीन गाळे लिलावाविना बंद अवस्थेत पडून आहेत. यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून नुकसानीचे पैसे त्यांच्याकडून वसुल करावेत, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचा इशाराही कांदळगावकर यांनी दिला.
पालिकेच्या मच्छीमार्केटवरील मजल्यावर भाड्याने गाळे बांधले आहेत. आमच्या सत्ता कालावधीमध्ये याठिकाणी लाईट व्यवस्थेबाबत जे काम अपुरे होते, ते पूर्ण करून गाळे वापरासाठी योग्य स्थितीत करून ठेवले होते. या गाळ्यांच्या लिलावासाठी नगररचना कार्यालयाकडून भाडे ठरवून घेण्याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी अद्याप याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही, असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे. यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावाही केला आहे. त्याचप्रमाणे प्राधान्याने विशेषतः मच्छीमार बांधवांना अभिप्रेत धरून त्यांना या मच्छीमार्केटच्या ठिकाणी आपल्या व्यवसायाचे कार्यालय, त्यांच्या मच्छीमार सोसायटीचे कार्यालय, मासेमारीच्या अवजारांची दुकाने यासाठी व अन्य व्यावसायिकांसाठी भाड्याने गाळे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे गाळे बांधले होते. तो उद्देशही असफल झाला आहे. आज अनेक जणांची भाड्याने जागेची मागणी असताना अशा मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे बंद अवस्थेत आहेत, याकडे कांदळगावकर यांनी लक्ष वेधले आहे.
---
लिलाव न झाल्याने गाळे बंद
पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी असलेले गाळेही लिलाव न झाल्याने बंद आहेत. मालवणसारख्या पर्यटन शहर म्हणून विकसित होत असलेल्या शहरात भाड्याने जागांची मागणी असतानाही वारंवार कळवूनही याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप कांदळगावकर यांनी केला आहे. गाळे बंद असल्याने पालिकेच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून हे पैसे वसूल करावे व कारवाई करावी, अशी मागणी शासनाकडे करणार आहोत, असा इशारा कांदळगावकर यांनी दिला आहे.