
धमाल मस्तीसह आठवणींत रमले वर्गमित्र
swt१८११.jpg
03637
सावंतवाडी : स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले माजी विद्यार्थी.
धमाल मस्तीसह आठवणींत रमले वर्गमित्र
''कलंबिस्त''चे माजी विद्यार्थीः सावंतवाडीत स्नेहमेळ्यानिमित्त ३० वर्षांनी भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमधील दहावी १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी (ता. १४) उत्साहात झाला. यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी स्नेहमेळाव्याला बहार आली. जुन्या आठवणींच्या उजाळ्यासह धमाल मस्ती व मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे स्नेहमेळाचा अविस्मरणीय ठरला.
शिरोडा वेळागर येथील रमणीय व निसर्गरम्य असलेल्या रिसॉर्टच्या ठिकाणी झालेल्या या मेळाव्यात ग्रुपमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामधून आपली ओळख करून देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सद्यस्थितीत सर्वजण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत, याचाही आढावा घेतला. सर्वांनीच आपले वाढते वय विसरून सहकारी मित्रांसोबत धमाल केली. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतारांचे अनुभव कथन केल्याने सर्वांची मने मोकळी झाली. पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याची अनुभूती मिळाली. दहावीनंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल तीन दशकानंतर या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. मैत्री सोहळा साजरा करण्यासाठी कलंबिस्तसह वेर्ले, सावरवाड, शिरशिंगे या गावांमधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असलेला हा स्नेहसोहळा उत्तम नियोजनात दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन दीपक राऊळ, सतीश सावंत, सुषमा सावंत व संजय पालकर यांनी केले.
यात दीपक राऊळ, दीपाली नाईक, विष्णू राऊळ, रामा राऊळ, सतीश सावंत, प्रवीण कुडतरकर, ज्युली फर्नांडिस, महेश मडगावकर, केशव पवार, अनिल राऊळ, अनिल देसाई, कलेशा म्हाडगुत, रामा राऊळ, सूरज पवार, कल्पना पास्ते, रजनी राणे, रेश्मा पवार, सुनील राऊळ, संजय पालकर, राजेश गोवेकर, गोपाळ बांदेकर, संतोष राऊत, सुनील राऊळ, जयेंद्र राऊळ, महेश राऊळ, दिनेश देसाई, सुभाष कुडतरकर आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. दिवंगतांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पालकर व सुषमा सावंत यांनी केले. उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. परिचय व मनोगतासोबत केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर सर्वांना आठवणरुपी भेट मोमेंटो दिले. संसार सांभाळताना अशा स्नेहमेळ्याच्या माध्यमातून निदान एक दिवस तरी स्वतःसाठी जगावे, असा संदेश माजी विद्यार्थ्यांनी दिला. आभार विष्णू राऊळ यांनी मानले. सहभोजनानंतर शिरोडा वेळागरच्या रुपेरी किनाऱ्यावर विविध खेळ खेळत समुद्र सफरीचा व स्नानाचा आनंद देखील लुटला. पुढील वर्षी परत भेटण्याचा संकल्प करीत दिवसभराच्या आठवणी मनात साठवत सर्वांनी निरोप घेतला.
चौकट
शाळेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प
कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूतील सर्व वर्ग सुसज्ज व अत्याधुनिक असावेत, या दृष्टीने १९९३-९४ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून सप्टेंबर २०२२ मध्ये एका वर्गखोलीसाठी फ्लोरिंग फरशी बसविण्याचा खर्च करून सामाजिक बांधिलकी राखली. यापुढील काळात देखील शाळेसाठी नेहमीच कार्यरत राहू, असा संकल्प या स्नेहमेळाव्यात करण्यात आला.