शहरातील विवाह नोंदणी आता रुग्णालयात

शहरातील विवाह नोंदणी आता रुग्णालयात

शहरातील विवाह नोंदणी आता रुग्णालयात
शासन आदेश ः ग्रामपंचायतींसाठीचे अधिकार कायम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये मिळणारे विवाह नोंदणी दाखले आता त्या-त्या भागातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये मिळणार आहेत. तशा प्रकारचा शासन निर्णय नुकताच देण्यात आला आहे; मात्र ग्रामपंचायत पातळीवरील अधिकार हे संबंधित ग्रामसेवकांकडेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरी भागातील नववधूंना दाखल्यासाठी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे.
शासनाच्या आरोग्य विभाग आणि नगरविकास विभागाच्यावतीने विवाह नोंदणी संदर्भात नवीन शासन निर्णय घेतला असून संबंधित विभागाला तशा सूचनाही केल्या आहेत. मुळात शासकीय रुग्णालय आणि विवाह नोंदणी याचा काहीही संबंध नसताना विवाह नोंदणीचे अधिकार शासकीय रुग्णालयातील रुग्णालय अधीक्षकांना देणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी शहरी भागाततील विवाह झालेल्या नववधूंना विवाह नोंदणीसाठी त्या भागातील नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे जावे लागत होते; मात्र आता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा अधिकार काढून घेत तो त्या भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकाकडे देण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावरमिळणारा हा दाखला त्या ठिकाणीच ग्रामसेवकांकडून देण्यात येणार आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
हा निर्णय घेताना त्यात असे म्हटले आहे की, ''नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीत उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय नसल्यास विवाह नोंदणी दाखल्याचा अधिकार मुख्याधिकारी यांनाच आहे. म्हणजेच त्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच हा दाखला मिळणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग वैद्यकीय अधिकारी हा दाखला देणार आहेत. त्यामुळे आता नववधूंना नगरपालिका, नगरपंचायतीच्या ऐवजी त्या-त्या भागातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय अधीक्षकांकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज करावा लागणार आहे. शासकीय कामकाजाच्या दिवसात त्यासाठी संबंधित जोडप्याने अर्ज करावयाचा आहे. शिवाय महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनीयमन आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व या संदर्भातील नियमानुसार शुल्क आकारणी केली जाणार आहे. विवाह नोंदणी संदर्भात काही तक्रारी असल्यास निबंधक विवाह मंडळ व विवाह नोंदणी (राज्यस्तर) पुणे व संचालक (२) आरोग्य सेवा पुणे तसेच आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडे नोंदवायच्या आहेत.

चौकट
नवा व्याप
पालिकेकडे हा अधिकार असताना कामकाजाच्या सर्व दिवशी नोंदणी शक्य व्हायची. रुग्णालयाकडे काम सुपूर्त केल्याने जिल्ह्यात आधीच अपुऱ्या कर्मचारी वर्गाने हैराण असलेली ही यंत्रणा नव्या व्यापात गुंतणार आहे. उपलब्ध माहितीनुसार आठवड्यातील एकच दिवस या प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे. यामुळे नोंदणी करणाऱ्यांनाही जास्त प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. मुळात विवाह आणि आरोग्य याचा कोणताही संबंध येत नसताना निर्णय कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोट
विवाह निर्णय दाखला नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गेले कित्येक वर्ष दिला जात होता; मात्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता आमच्याकडील अधिकार काढून तो उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णालय अधीक्षकांना देण्यात आला आहे. त्यामुळे विवाह नोंदणी दाखल्यासाठी नववधूंनी पालिका आरोग्य विभागाकडे अर्ज न करता तो उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकाकडे करण्यात यावा.
- पांडूरंग नाटेकर, आरोग्य निरिक्षक, सावंतवाडी नगरपरिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com