कोकणासाठी 175 नवीन कृषी पर्यटन केंद्र मंजूर

कोकणासाठी 175 नवीन कृषी पर्यटन केंद्र मंजूर

३८ ( पान ३ साठी, मेन)

कोकणला १७५ नवीन कृषी पर्यटन केंद्र मंजूर

शासकीय योजनांचा लाभ शक्य; गॅस, वीज घरगुती दराने

रत्नागिरी, ता. १८ ः ग्रामीण जीवनशैलीबाबत पर्यटकांना असलेले आकर्षण लक्षात घेऊन पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण किनारपट्टीतील चार जिल्ह्यात १७५ नवीन कृषी पर्यटन केंद्रांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रांना शासनाकडून विविध योजनांचा प्राधान्याने लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेती व्यवसायाला पूरक आणि जोडव्यवसाय म्हणून उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकऱ्‍यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिकापालन मत्स्य व्यवसाय आदी कृषी संलग्न विषयांचा एकत्रित विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते. त्यानुसार कोकणातही समृद्ध किनारपट्टीलगत अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये आता कृषी पर्यटन ही संकल्पना नव्याने जोर धरू लागली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच ही संकल्पना वेगाने विकसित होत असताना आता कोकणातही कृषी पर्यटनाची अनेक केंद्रे त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे आणि शहरी घटकांना शांत ठिकाणी राहून पर्यटन आनंदासाठी एक सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्यासाठी कृषी पर्यटन धोरण राबवण्यात येत आहे.
कोकणातील प्रस्तावित करण्यात आलेल्या २३७ कृषी पर्यटन केंद्राच्या प्रस्तावांपैकी १७५ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यांना या केंद्रांची अधिकृत परवानगीही देण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन संचालनालयाकडून प्रोत्साहन म्हणून नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. त्यानुसार हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटन धोरणांतर्गत जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्‍या शेततळे आणि पाणी नियोजनाच्या विविध योजनेकरिता कृषी पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येणार आहे. नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास राज्य व केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्‍या ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवडसारख्या योजनांचे फायदे घेता येणार आहेत. ज्या ठिकाणी घरगुती स्वयंपाकगृह वापरले जाणार आहे अशा केंद्रांना निवास व न्याहारी योजनेच्या धर्तीवर घरगुती गॅस जोडणीसह घरगुती दरानेच विजेचाही वापर करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com