
कोनाळच्या समस्यांबाबत उपसरपंचांनी वेधले लक्ष
कोनाळच्या समस्यांबाबत
उपसरपंचांनी वेधले लक्ष
दखल न घेतल्यास उपोषण
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ ः कोनाळ भागात उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी तिलारी पाटबंधारे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांची पूर्तता केली नसल्यास १ जूनला तिलारी कार्यालयासमोर उपोषण छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात कर्पे यांनी म्हटले आहे की, चंदगड-दोडामार्ग मुख्य राज्यमार्ग ते एम. आर. नाईक माध्यमिक विद्यालय कोनाळकट्टा शाळेकडे जाणारा रस्ता नादुरूस्त असून त्याची डागडुजी करावी. ठाकरवाडी येळपई नाल्यावर संरक्षक कठडे बांधावेत. अतिवृष्टीमुळे कोनाळकट्टा येथे तिलारी नदीपात्रात साचलेला गाळ काढावा. कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या जादा पाणी प्रवाहामुळे कोनाळकट्टा नळ योजनेला धोका निर्माण झाला आहे. कोनाळ गावात येणारे मायनरचे काम त्वरित चालू करावे. कोनाळकट्टा यांत्रिकी वसाहतीत पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीपैकी १५ गुंठे जागा ग्रामपंचायत इमारतीस उपलब्ध करून द्यावी. तेथील जीर्ण पाण्याची जुनी टाकी पाडावी. तिलारी धरणावर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये स्थानिकांची नेमणूक करावी, अशा विविध मागण्याचे निवेदन सादर केले असून जर या मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ जूनपासून उपोषण छेडू, असा इशारा उपसरपंच कर्पे यांनी दिला.