
कुडाळात 23 ला स्त्री-शक्ती शिबिर
कुडाळात २३ ला
स्त्री-शक्ती शिबिर
अमोल पाठकः महिलांना लाभ घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्री-शक्ती समस्या समाधान शिबिर हा उपक्रम २३ ला येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये सकाळी १० वाजता आयोजित केला आहे, अशी माहिती येथील तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली.
येथील तहसिल कार्यालयात या उपक्रमाबाबत नियोजन बैठक झाली. यावेळी नायाब तहसिलदार दाभोलकर, मुख्याधिकारी अरविंद नातु, महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी सौ. पाटकर उपस्थित होत्या. यावेळी श्री. पाठक म्हणाले, ‘‘समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिरात शासनाच्या विविध विभागांचे जवळपास २० स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये महिला बचतगटांचे स्टॉल सुद्धा लावण्यात येणार आहेत. या शिबिरात ज्यांना येणे शक्य होणार नाही, त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे आपल्या समस्यांचा अर्ज देण्यास हरकत नाही. त्या अर्जाची या अभियानात नोंद घेतली जाणार आहे. या शिबिरामध्ये शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध विभागाच्या योजनांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांची माहिती पत्रके, माहिती पुस्तिका इत्यादी सर्वसामान्य महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उपस्थित महिलांच्या शंकांचे निवारण होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ घ्यावा.’’