
आंतरजातीय विवाह योजनेचे 10 लाख प्राप्त
03785
आंतरजातीय विवाह योजनेचे १० लाख प्राप्त
अजून ३० लाखांची प्रतीक्षा; ६० लाभार्थी मात्र वंचित
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी निधी अभावी अद्यापही जिल्ह्यातील ६० लाभार्थी जोडपी लाभापासून वंचित आहेत. चालूवर्षी या योजनेसाठी आतापर्यंत केवळ १० लाख निधी प्राप्त झाला असून अद्यापही ३० लाख निधी आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंत जिल्ह्यातील १९१ लाभार्थीना लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार प्रमाणे ९५ लाख ५० हजार रूपये अनुदान वितरित झाले आहेत; मात्र, गतवर्षी २०२१-२२ पासून या योजनेसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नव्हते. यावर्षी या योजनेसाठी केवळ १० लाख अनुदान प्राप्त झाले. त्यातून २० लाभर्थींना प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला आहे. गतवर्षीच्या प्रलंबित ५४ प्रस्तावातील अद्याप ३४ प्रस्ताव व २०२२-२३ मध्ये प्राप्त झालेले ३६ प्रस्ताव असे मिळून एकूण ६० जोडप्यांचे प्रस्ताव निधी अभावी अद्यापही प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी केंद्र व राज्याकडून निधी देण्यात येतो. आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला देण्यात येणारी ५० हजाराची रक्कम ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. प्रस्ताव केलेल्या पती- पत्नी (जोडप्यांच्या) दोघांच्या बँक खात्यात प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले जातात. चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) साठी आतापर्यंत ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. गतवर्षीचे प्रलंबित ५४ जोडप्यांच्या प्रस्तावापैकी २० लाभार्थींना नव्याने प्राप्त झालेल्या १० लाख निधीतून लाभ दिला आहे. त्यामुळे अद्यापही गतवर्षीचे ३४ लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची योजना राबविण्यात येते.
--
निधी नसल्याने प्रस्ताव प्रलंबित
या योजनेचा लाभ २०१७-१८ पासून २०२०-२१ या चार वर्षांत १९१ लाभार्थींनी घेतला आहे. त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे ९५ लाख ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान वितरित केले आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५४ जोडप्यांनी व २०२२-२३ मध्ये ३६ जोडप्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १० लाख प्राप्त निधीतून गतवर्षीच्या २० लाभर्थींना लाभ दिल्याने अद्यापही ६० प्रस्ताव प्रलंबित आहेत; मात्र, शासनाकडून आवश्यक निधी प्राप्त झाला नसल्याने हे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यांचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे प्रलंबित आहेत.
-------------
चौकट
यांना मिळतो लाभ
योजनेच्या लाभासाठी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागकडे प्रस्ताव करावेत. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते, अशा प्रकारे विवाह झालेल्या जोडप्यांना लाभ मिळतो.
---------
कोट
सिंधुदुर्गात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी सुमारे ५० ते ६० प्रस्ताव शासनाच्या प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त होतात. गतवर्षीपासून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील ६० प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून या सर्व लाभार्थीना लाभ देण्यासाठी ३० लाख निधीची गरज आहे. तो उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून निधी येताच प्राधान्यक्रमानुसार लाभार्थींना लाभ दिला जाईल.
- संतोष भोसले, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग
--
03787
चार वर्षांत १९१ लाभार्थींना लाभ
*वर्ष*लाभार्थी*निधी
*२०१७-१८*३९*१९,५००००
*२०१८-१९*५४*२७,०००००
*२०१९-२०*४२*२१,०००००
*२०२०-२१*५६*२८,०००००