
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना
१० (पान २ साठी)
शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड
कृषी विभाग ः जिल्ह्यातील पडीक जमिन लागवडीखाली
रत्नागिरी, ता. १९ ः वैयक्तिक लाभधारक शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनवाढीसाठी सलग, बांधावर व पड जमिनीवर फळझाड, फुलझाडे, मसालापिके यांच्या लागवडीसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, वनविभाग यांच्यामार्फत राबवली जात असून ०.०५ हेक्टरपासून २ हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ घेता येतो.
शेतकऱ्यांसाठी ही योजना खूपच फायद्याची असून, ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषी विभागामार्फत देण्यात येऊन फळबाग, वृक्ष, फूलपिक लागवड सुरू केली जाऊ शकते. निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिकेमधून जातीवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच फळबाग लागवडीचे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फळझाडे लागवडीसाठी वाव असून, हवामान आंबा, काजू, नारळ, सुपारीसाठी पोषक असून पडजमीन फळबागेच्या लागवडीखाली आल्यामुळे पुढील तीन ते चार वर्षात शेतकऱ्याला शाश्वत उत्पादनाचे साधन तयार होऊ शकते.
अनुसूचित जाती, जमाती, भटक्या, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी १ हेक्टरपेक्षा जास्त; परंतु २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले किंवा जमीनमालक व कूळ, सीमांत शेतकरी, १ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी आणि जमीनमालक व कूळ आदी पात्र लाभार्थी ठरतील. प्रत्येक महसुली गावात २४ तास अर्ज टाकता येईल. सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी म्हणजेच अंगणवाडी शाळा, ग्रामपंचायत, समाजमंदिर आदी ठिकाणी पेटी ठेवण्यात येणार आहे. अर्ज वर्षभर केव्हाही करता येतो; मात्र १५ जुलै ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आलेले अर्ज मंजूर करून त्या वर्षाच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट केले जातील. यासाठी सातबारा उतारा, ८ अ उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉबकार्ड, दारिद्रयरेषेखाली असल्यास तो दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे जोडावे लागतील.
---
कोट
योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीवर फळझाडाची लागवड करावी. इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या ग्रामपंचायत किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या कोणत्याही कार्यालयाशी संपर्क साधावा.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी