रत्नागिरी ः दोन दिवस किनारी भागात वेगवान वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः दोन दिवस किनारी भागात वेगवान वारे
रत्नागिरी ः दोन दिवस किनारी भागात वेगवान वारे

रत्नागिरी ः दोन दिवस किनारी भागात वेगवान वारे

sakal_logo
By

दोन दिवस किनारी भागात वेगवान वारे
रत्नागिरीत पारा ३८ अंशावर ; दोन दिवस अधिक उष्ण
रत्नागिरी, ता. २० ः समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्‍याची स्थिती निवळल्याने कमाल तापमानात वाढ कायम आहे. गेले दोन दिवस किनारी भागात वेगवान वारेही वाहत आहेत. मोचा चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचीही तीव्रता निवळल्यानंतर किनारपट्टीजवळील भागात वाढत्या तापमानाचा धोका कायम राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात ३७ अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली तर सोमवारी रात्री किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने वाढले.
कोकण किनारपट्टी भागात वादळाच्या प्रभावाने आलेली मळभ स्थिती ओसरल्यानंतर आता उन्हाचा दाह वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी सकाळी १० वा. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात ३७ अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद झाली तर सोमवारी रात्री किमान तापमानही सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने वाढले. त्यामुळे वातावरणातील उष्माही वाढला होता. उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारच्या सुमारास बाहेर पडणेही शक्य झालेले नव्हते. अद्याप बिगर मोसमीसह मोसमी पावसाची शक्यता आठवडाभर नसल्याने या आठवड्यासह पुढील आठवड्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा तापदायक ठरत आहेत. उकाड्यात वाढ झाल्याने उष्माघाताने आरोग्यावर प्रतिकूल परिणामाची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. किनारी भागातही समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत वाढ झाल्याने किनारी परिसरातील गावांमध्येही उष्मा वाढला आहे. सोमवारी रत्नागिरीत कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस नोंदवले गेले तर मंगळवारी यामध्ये दुपारच्या सत्रात वाढ झाली.

मोचा वादळाच्या परिणामामुळे वातावरणात बदल होतील, अशी शक्यता होती; मात्र वादळाने दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीवर त्याची तिव्रता जाणवली नाही. गेले दोन दिवस समुद्रकिनारी भागात वारे वाहत आहेत. सायंकाळी त्याचा जोर अधिक असतो. याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसला आहे तर अनेक मोठ्या नौकांनी खोल समुद्रात जाणे टाळले होते. सध्या मच्छीमारीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात मिळेल तेवढी मासळी पकडून भविष्यातील तजवीज करण्याची तयारी मच्छीमार करत आहेत. वादळ शमल्याने संकट टळल्यामुळे जोमाने मासेमारी सुरू केली आहे.